आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारपीट राेखणारे यंत्र म्हणजे शेतकऱ्यांची निव्वळ दिशाभूल,प्रयाेग अद्याप सिद्ध नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्राच्या शिवारावर व बळीराजांवर गारपिटीचे संकट नियमित अाेढवत अाहे. गारपिटीने होणारे शेतीचे नुकसान टाळणारी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसल्याने शेतकरी हतबल आहे. या पार्श्वभूमीवर ‘गारपीट रोखणाऱ्या यंत्रा'चा प्रसार सुरू झालाय. ‘स्केलर एनर्जी (वेव्ह)' हा या यंत्राचा आधार आहे. मात्र, या स्केलर एनर्जीचेच अस्तित्व बहुसंख्य शास्त्रज्ञांना अमान्य असल्याने हे यंत्र म्हणजे वैज्ञानिक भोंदूगिरी असल्याचा दावा केला जात अाहे.
गारपीट रोखणारे कोणतेही मार्ग सध्या भारतात नाहीत. गारपीट थांबवण्याचे दावे वैज्ञानिक कसोट्यांवर सिद्ध झाले नसल्याने अशा यंत्रांमध्ये शेतकऱ्यांनी आर्थिक व भावनिक नुकसान करून घेऊ नये, असे तज्ज्ञांचे सांगणे आहे.

हवामानविषयक संशाेधन नाहीच
‘आयआयटीएम'चे वरिष्ठ संशोधक डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी म्हणाले, "प्रचलित विज्ञान आणि प्रस्थापित वैज्ञानिक सिद्धांत यात कुठेही स्केलर एनर्जीचा वापर होत नाही. जगभरात या संदर्भात हवामानविषयक संशोधन झालेले नाही." वाऱ्यांची दिशा, बाष्पनिर्मिती, गारा तयार होणे, ढगांचे आकार या प्रक्रियेत स्केलर एनर्जीचा संबंध येत नाही, असाही कुलकर्णी यांचा दावा अाहे.

वादग्रस्त स्केलर एनर्जी
निकोल टेस्ला या शास्त्रज्ञाने शंभर वर्षांपूर्वी स्केलर वेव्हची संकल्पना सर्वप्रथम मांडली. फ्री एनर्जीचा हा नवा स्रोत असून त्याचे वायरलेस ट्रान्समिशन शक्य अाहे. स्केलर वेव्हच्या माध्यमातून पृथ्वीच्या दुसऱ्या टोकावर असलेली शत्रूची शेकडो विमाने, सैन्य काही क्षणांत नष्ट करता येणे शक्य असल्याचा त्याचा दावा होता. टेस्लाच्या संशोधनाला प्रारंभीपासूनच वादाचे आणि गूढतेचे वलय लाभले. नंतरच्या काळात भौतिकशास्त्राने या संशोधनाला पुष्टी दिली नाही. आजमितीस टेस्लाच्या संशोधनाचा आधार घेतला जात नाही किंवा त्याच्या संशोधनातही भर पडलेली नाही.
बुलडाणा जिल्ह्यात प्रयाेग, ‘गारा पडल्या, पण छाेट्याशा’
बुलडाणा जिल्ह्यातील हिवरखेड (ता. खामगाव) येथील दादाराव हटकर यांच्या शेतात ‘स्केलर वेटर जनरेटर’ नावाचे हे यंत्र बसवण्यात अाले अाहे. हटकर यांना सुमारे दीडशे एकर शेती असून त्यात संत्रे, डाळिंब, सीताफळ, अप्पर बोराच्या बागा अाहेत. सुमारे एक लाख रुपये खर्च करून त्यांनी हे यंत्र बसवले अाहे. ‘आमच्या भागात ११ ते १३ एप्रिलदरम्यान सलग गारपीट झाली. इतरत्र माेठ्या गारा पडल्या. अामच्या परिसरात मात्र लहान गारा पडल्या,’ असे जाधव सांगतात. अशी यंत्रे महाराष्ट्रातील सातारा, नगर, बुलडाणा जिल्ह्यात बसवण्यात अाल्याचे ते सांगतात.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरॉलॉजी (आयआयटीएम) या राष्ट्रीय संशोधन संस्थेतून निवृत्त झालेले संशोधक डॉ. दत्तात्रय जाधव यांनी ‘स्केलर वेव्ह जनरेटर' हे यंत्र तयार केले अाहे. या यंत्राने ढगात तयार झालेल्या गारा विरघळतात, असा त्यांचा दावा आहे. राज्यातल्या काही शेतकऱ्यांनी सुमारे एक लाख रुपये खर्चून हे यंत्र शेतात बसवले आहे. यासंदर्भात ‘दिव्य मराठी'ने जाधव यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याशी झालेली काही प्रश्नोत्तरे थोडक्यात -
गारपीट रोखणाऱ्या तुमच्या यंत्राबद्दल सांगा.
जाधव : दाेन फूट व्यास आणि सात फूट उंचीचे यंत्र मी तयार केलेय. याला एक वायर जोडलेली असून ती जमिनीत गाडली जाते. या वायरच्या माध्यमातून भूपृष्ठातील स्केलर एनर्जी शोषून यंत्रात आणली जाते. यंत्रात विविध धातूंचा अॅम्लिफायर बसवला आहे. पृथ्वीतून येणारी स्केलर एनर्जी यातून अॅम्प्लिफाय करून आकाशात सोडली जाते.

स्केलर एनर्जी म्हणजे काय?
जाधव - अगदी थोडक्यात सांगायचे तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा हा प्रकार आहे. कोणतीही वस्तू भेदण्याची ताकद या ऊर्जेत असते. डार्क मॅटरमधून स्केलर एनर्जी तयार होत असते. ती एकत्र करून त्याचा प्रभावी वापर माझ्या यंत्राद्वारे करता येतो.

स्केलर एनर्जीबाबत आणखी कुठे संशोधन झाले आहे?
जाधव - त्याबद्दल मी सांगू शकणार नाही; पण माझे संशोधन २०१२ पासून सुरू आहे. माझ्या यंत्राचा उपयोग ढग नष्ट करणे, त्यांचा आकार वाढवून अधिक पाऊस पाडणे, गारा विरघळवण्यास होत अाहे.

शास्त्रीय पातळीवर प्रयोग सिद्ध झाला का? पेटंट घेतले का?
जाधव : नाही. "माझ्या प्रयोगांना वैज्ञानिक मान्यता मिळालेली नाही. देशातल्या वा परदेशातल्या कोणत्याच संशोधन संस्थेने त्यावर अधिकृततेची मोहोर उमटवलेली नाही,’ हे जाधव स्वतः मान्य करतातच; पण ज्या संस्थेतून ते निवृत्त झाले ती संस्थादेखील ‘स्केलर एनर्जी'च्या वापराला पुष्टी देत नसल्याचे समाेर अाले अाहे.
गारपीट राेखण्यासाठी राॅकेट नेटवर्क?
रशिया, सर्बियासारख्या मोजक्या देशांत गारपीट थांबवण्याचे प्रयत्न होतात. यासाठी विशेष रॉकेटचे नेटवर्क कायमस्वरूपी बसवल्याचा त्यांचा दावा आहे. सॅटेलाइट व डॉप्लर रडार यंत्रणेकडून गारपिटीचा अंदाज मिळाल्यानंतर रॉकेटच्या माध्यमातून क्लाउड सीडिंग केले जाते. यामुळे ढगांमधील जास्तीत जास्त बाष्पाचे रूपांतर पावसात होते. पाऊस पडल्याने गारा निर्मितीसाठी पुरेसे बाष्प ढगांमध्ये उरत नाही आणि गारपिटीचा धोका कमी होतो.

गारांचा वेध
भूपृष्ठापासून सुमारे आठ किलोमीटर उंचीवरच्या ढगांचे तापमान उणे चाळीस अंश वा त्यापेक्षा कमी असते. अशा ढगांमध्ये गारा तयार होण्याची शक्यता जास्त असते. ढगांचा आकार, त्या प्रदेशातील तापमान, वाऱ्यांची दिशा व वेग, बाष्पाचे प्रमाण इत्यादी घटकसुद्धा गारानिर्मितीमध्ये महत्त्वाचे असतात. गारांची निर्मिती ही अत्यंत स्थानिक स्वरूपाची आणि अनेक घटकांवर अवलंबून असलेली घटना असल्याने एक- दोन तास आधीच तिचा अंदाज बांधता येतो. मात्र, त्यासाठी अद्ययावत रडार, सॅटेलाइट आदी यंत्रणेच्या माध्यमातून मिळालेला डेटा हाताशी असावा लागतो, असे तज्ज्ञ डॉ. किरणकुमार जोहरे म्हणाले.