आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आघाडी सरकारने फसवणूक केल्याने निवडणुकीवर बहिष्कार- धनगर समाजाचा निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने धनगर समाजाची घोर फसवणूक केली आहे. गेली दोन महिने वारंवार आश्वासन देऊनही सरकारने एकही कृती नसल्याचे सांगत आगामी विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय धनगर आरक्षण संघर्ष कृती समितीने घेतला आहे. यानुसार आघाडीच्या आमदार, खासदार, मंत्री व नेत्यांच्या सभेला व इतर कोणत्याही कार्यक्रमाला हजर न राहण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार यांच्यासह शरद पवार यांच्या भेटी घेऊनही विषय मार्गी न लावल्याने धनगर समाजात तीव्र असंतोष आहे.
धनगर समाज आरक्षण संघर्ष कृती समितीच्यावतीने आज राज्यभर आघाडी सरकारचा निषेध म्हणून राज्यभर तहसीलदार कार्यालयावर आंदोलन मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर कृती समितीच्या सदस्यांनी पुढील निर्णय घेतला. या समितीचे अध्यक्ष बाळासाहेब गावडे यांनी बारामतीत सांगितले की, धनगर समाजाची मागणी रास्त असून, घटनेने दिलेले आरक्षण आघाडी सरकार नाकारत आहे. आघाडी सरकारच्या वरिष्ठ मंत्र्यांसह मुख्यमंत्री, शरद पवार यांच्या भेटी घेतल्या. स्वत: मुख्यमंत्र्यांनी समाजाची मागणी योग्य असल्याचे सांगत धनगर व धनगड एकच असल्याचे मान्य केले आहे. तरीही बैठकीत एक बोलतात व नंतर काहीही करीत नाहीत. आघाडी सरकारने आमची फसवणूक केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत धनगर समाज मतदानावर बहिष्कार घालत आहे. तसेच आघाडी सरकारला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असे गावडे यांनी सांगितले.
भारतीय राज्यघटनेनुसार धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू आहे. पण धनगरऐवजी धनगड असा भाषिक (हिंदी) भेद झाल्याने हा समाज मागील 67 वर्षे आरक्षणापासून वंचित आहे. यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्रात धनगर आणि धनगड हे एकच असून झालेला शब्दच्छल दुरुस्त करावा अशी साधी शिफारस केंद्राला करणे गरजेचे आहे. मात्र राज्य सरकार ते करीत नसल्याचे दिसून आले आहे.