आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेट्टी-खोतांमधील ‘स्वाभिमान’ चिघळला, एकाच विश्रामगृहावर थांबणे खोत यांनी टाळले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘माझा दोस्त’ अशी एकमेकांना आपुलकीची हाक मारणारे स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि कृषि-पणन राज्यमंत्री यांच्यामधे ‘स्वाभिमाना’ची मोठी भिंतच उभी राहिल्याचे शुक्रवारी दिसून आले. शेट्टी नवीन शासकीय विश्रामगृहात उतरले असल्याचे समजल्यावर खोत यांनी विश्रामगृहात न उतरता पाणीपुरवठा विभागाचे विश्रामगृह गाठले. या विसंवादीपणामुळे स्वाभिमानीची शकले होणार की, काय अशीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 
 
अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्‍या जलावरण 
सोहळ्यापासून सुरु झालेले दोघांमधील खटके वाढतच आहेत. खोत यांच्या मुलाच्या लग्नात केलेला खर्चावरुन शेट्टी यांनी नापसंती व्यक्त केली होती. तसेच नुकत्याच झालेल्या जिल्हापरीषद निवडणूकीत मुलाला निवडणूकीत न उतरविण्याचा सल्ला देखील खोत यांना मानला नव्हता. त्यामुळे अशा घटनांमुळे दोघांमधील ताण अधिकच वाढला आहे.
 
जिल्हापरीषदेच्या निवडणूकीत लढलेल्या कार्यकर्त्यांशी शेट्टी यांनी शुक्रवारी संवाद साधला. त्या साठी ते पहाटे तीन वाजता कॅम्प येथील नवीन शासकीय विश्रामगृहात उतरले होते. याची माहिती कळताच खोत यांनी शासकीय विश्रामगृहावर जाणे टाळले. वास्तविक येथेच त्यांनी सदनिकाही आरक्षित केली होती. मात्र, त्या ऐवजी पाणी पुरवठा विभागाच्या विश्रामगृहावर जाणेच खोतांनी पसंत केले. 

याबाबत पत्रकारांनी शेट्टी यांना विचारले असता, ते म्हणाले, कदाचित पक्षाच्या कार्यकर्त्यांना जागा कमी पडू नये या साठी बहुदा ते कार्यक्रमाला आले नसावेत. त्यांचा आजचा कार्यक्रम मला माहीत नव्हता. ते आमच्या पक्षाचे मंत्री आहेत. राज्याच्या महत्त्वाच्या बैठका असल्याने त्यांना तेथेही असणे गरजेचे होते. निवडणूकानंतर ते चार-पाच दिवस देशाबाहेर गेले होते. त्यामुळे आमची भेट झाली नाही. मात्र, आमचे बोलणे होत असते. आम्ही लवकरच भेटू. 
 
खोत यांना यावर विचारले असता, आमच्यात फार अंतर नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, फार म्हणजे नक्की किती यावर मात्र ते फसले. याचे स्पष्टीकरण खोत यांना देता आले नाही. आमच्यात किती अंतर आहे, हे किलोमीटरच्या मोजपट्टीत मोजले नसल्याचे त्यांनी सांगितले.  
बातम्या आणखी आहेत...