आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dilip Walse patil Comments On Mla Resignation Drama

राजीनामा देणा-या आपल्याच पक्षाच्या चार आमदारांना दिलीप वळसे-पाटलांनी झापले!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर/पुणे- आपापल्या भागातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी आता राजीनामे देता मग ही बांधकामे होताना काय झोप काढता होता काय तुम्ही, अशा शेलक्या शब्दात आपल्याच पक्षातील चार आमदारांची खरडपट्टी विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी काढली. पुणे व पिंपरीतील राष्ट्रवादीच्या चार आमदारांनी आपल्या मतदारसंघातील अनधिकृत बांधकामे नियमित करावीत यासाठी राजीनामे दिले होते. यात भोसरीचे विलास लांडे, चिंचवडचे लक्ष्मण जगताप, पिंपरीचे अण्णा बनसोडे तर पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातील आमदार बापू पठारे यांनी वळसे-पाटील यांच्याकडे राजीनामे सुपूर्त केले होते.
याबाबत बोलताना दिलीप वळसे-पाटील यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांना झापले असले तरी राज्यात वाढत्या शहराकरणामुळे चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, राज्यात मागील दहा वर्षापासून झपाट्याने शहरीकरण वाढत आहे. त्याचा पायाभूत सुविधा पुरविताना ताण पडतो आहे. राज्यातील पालिका हद्दीलगत ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोणत्याही प्लॅनशिवाय गरजेनुसार बांधकामे बांधली जात आहे. त्याचा फटका काही कालांतराने ही गावे पालिका हद्दीत आल्यानंतर होतो. त्यामुळे संबंधित भागातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची कडक भूमिका असायला हवी. पण तसे होत नाही. बांधकामे सुरु असताना लोकप्रतिनिधी गप्प बसतात व नंतर लोक आपल्या विरोधात जावू नये म्हणून त्यांच्यासाठी राजीनामे देतात, ही चुकीची पद्धत रूढ होऊ पाहत आहे. शहरीकरण वाढत असल्याने तेथील स्थानिक प्रशासनावर पायाभूत सुविधा पुरविताना ताण पडतो हे सत्य आहे. पण भविष्यात आणखी अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी नगरविकास, महसूल, ग्रामविकास व तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचेही वळसे-पाटील यांनी सांगितले.