आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगभूमीच्या जिवंतपणाला पर्याय नाही , दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांचा पुण्यात हृद्य सत्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - रंगभूमी हे जिवंत माध्यम आहे. त्यामुळेच रंगभूमी आणि नाटक अधिक आव्हानात्मक आहे. मी अनेक माध्यमांतून काम केले असले तरीही रंगभूमीला पर्याय नाही, असे प्रांजळ मत ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी साेमवारी व्यक्त केेले.

डॉ. पटेल यांना नुकताच विष्णुदास भावे पदक प्रदान करून गौरवण्यात आले. याचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, संमेलन आयोजक समितीतर्फे त्यांचा हृद्य सत्कार ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी संमेलनाचे निमंत्रक संजय नहार, स्वागताध्यक्ष भारत देसलडा, महामंडळ अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, संवादचे सुनील महाजन, दीपा श्रीराम आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

जब्बार पटेल हा मस्त माणूस आहे, असे सांगून डॉ. लागू म्हणाले, आम्ही बी जे मेडिकलमधले सहाध्यायी होतो. तेव्हापासूनची मैत्री आजही टिकून आहे. त्याचे रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण आहे.

सत्काराला उत्तर देताना डॉ. पटेल यांनी आपल्या अभिनय, दिग्दर्शन, रंगभूमी, चित्रपटक्षेत्र, लघुपट-माहितीपट आणि चरित्रपटांच्या दिग्दर्शनाचा एक विस्तृत पट उलगडला. घाशीराम कोतवाल, तीन पैशांचा तमाशा, महानिर्वाण, पडघम, सामना, सिंहासन, उंबरठा, डॉ. आंबेडकर, यशवंतराव चव्हाण.. यांच्या निर्मिती व दिग्दर्शनाच्या अनेक आठवणींना यानिमित्ताने उजाळा मिळाला. मी अनेक माध्यमांतून जुन्या-नव्या तंत्रज्ञानासह काम केले. पण रंगभूमीचे जिवंतपण नेहमीच आव्हानात्मक वाटत आले. सतत भेटत राहिलेली विविध माणसे, त्यांचे अनुभव यातून माझे आकलन घडले. डॉ. लागू यांच्यासारख्या गुरुंच्या सहवासात खूप शिकता आले, असे पटेल म्हणाले.