आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेतून स्काइप वर साक्ष, घटस्फोट मंजूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- क्षयरोग (टीबी) झाल्यानंतर पत्नीने तरुणाची साथ सोडली व नेहमीसाठी अापल्या माहेरी निघून गेली. काही काळ नियमित उपचार घेतल्यानंतर तो बरा झाला आणि अमेरिकेत नोकरीसही गेला. मात्र, या दाेघांच्या घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते. जेव्हा सुनावणीची तारखी अाली तेव्हा घटस्फोटासाठी भारतात येणे त्या तरुणाला शक्य नव्हते. अखेर स्काइप अॅपद्वारे तरुणाची साक्ष नोंदवावी व निकाल द्यावा, अशी विनंती वकिलांकडून करण्यात आली. पुणे न्यायालयाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पती-पत्नीच्या संमतीने घटस्फोट झाला.   


राहुल व मनीषा (नावे बदलली अाहे) हे दाेघे उच्चशिक्षित. जुलै २०१३ मध्ये त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर काही दिवसांतच दोघांमध्ये खटके उडण्यास सुरुवात झाली. त्यातच राहुलला क्षयरोग झाल्याने सतत तो अाजारी असायचा. त्याच्यावर उपचारही सुरू हाेते. मात्र  पतीची काळजी घेण्याऐवजी मनीषा त्याला सोडून माहेरी निघून गेली. ती पुन्हा परतली नाही. पत्नीच्या वागण्याचा त्रास झाल्याने राहुलने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले. दरम्यान, राहुलने क्षयरोगाचा नियमित उपचार घेतला. आजार बरा झाल्यानंतर त्याला अमेरिकेत चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी उपलब्ध झाली व तो रवाना झाला. अॅड. जे.पी. बारमेडा व अॅड. शीतल भुतडा यांनी न्यायालयात प्रलंबित असलेला घटस्फोटाचा दावा सुरूच ठेवला होता. राहुलला न्यायालयात प्रत्यक्षात हजर राहणे शक्य नव्हते. वकिलांनी स्काइपद्वारे न्यायालयात राहुलचा जबाब नोंदवून घेतला व स्काइपद्वारे निकाल देण्यासाठी अर्ज केला. त्यानंतर न्यायालयाने स्काइपला मंजुरी देत पती-पत्नीचा घटस्फोट मंजूर केला.   


तंत्रज्ञानामुळे पैसा, वेळेची झाली बचत  
अाज सर्वच क्षेत्रात माहिती व तंत्रज्ञानाचा वापर केला जात अाहे. या खटल्यातही व्हिडिओ, ऑडिओ कॉलिंगची सुविधा असलेल्या स्काइप अॅपद्वारे साक्ष नोंदवली गेल्याने अमेरिकेत नोकरीस असलेल्या राहुलला प्रवास करण्याची गरज पडली नाही. शिवाय जलदगतीने न्यायालयीन प्रक्रिया पार पडली. पैसा आणि वेळेचीही बचत झाली, अशी प्रतिक्रिया अॅड. जे.पी. बारमेडा यांनी दिली.  

बातम्या आणखी आहेत...