आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Divya Marathi State Editor Abhilash Khandekar Speech In Pune

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बदल न केल्यास वृत्तपत्रे कालबाह्य - अभिलाष खांडेकर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ‘थक्क करणा-या वेगाने समाज, तंत्रज्ञान आणि इतर संदर्भ बदलत आहेत. त्या अनुषंगाने मराठी वृत्तपत्रे बदलली नाहीत तर ती कालबाह्य ठरण्याचा धोका आहे,’ असे मत दै. ‘दिव्य मराठी’चे स्टेट एडिटर अभिलाष खांडेकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागात ‘मराठी मुद्रित माध्यमांची सद्य:स्थिती आणि आव्हाने’ या विषयावर ते बोलत होते. वृत्तपत्रांनी काळाचे भान ठेवले नाही तर लोक वाचणे बंद करतील. लोकहिताचे नावीन्यपूर्ण विषय सातत्याने देण्याचे आव्हान माध्यमांना पेलावे लागेल’, असे खांडेकर म्हणाले. विभागाचे समन्वयक संजय तांबट यांनी प्रास्ताविक केले.
खांडेकर म्हणाले की, ‘समाजातील अन्याय, वाईट घटना लोकांना पसंत नसतात; परंतु सर्वसामान्य माणूस हतबल असल्याने पोलिस, न्यायव्यवस्था, माध्यमे यांनी त्याविरुद्ध प्रहार करावा, अशी त्याची अपेक्षा असते. कोणाच्याही दबावात न येणारी निर्भीड व नि:पक्ष पत्रकारिता लोकांना आवडते. वाचकांना अपेक्षित असणारी हीच पत्रकारिता दै. ‘दिव्य मराठी’ करीत आहे. त्यामुळेच औरंगाबाद, जळगाव, नाशिक, नगर आणि सोलापूर या पाचही ठिकाणी अल्पावधीत वाचकांनी ‘दिव्य मराठी’ला पहिल्या क्रमांकाची पसंती दिली आहे. माहिती मिळवण्याचे अनेक मार्ग आज वाचकांपुढे खुले झाले आहेत. मोबाइल, आयपॅड, ट्विटर, सोशल मीडिया या माध्यमांमधून सतत माहितीचा ओघ सुरू असतो. जीवनाची गती एवढी वाढली आहे की, दिवसाच्या चोवीस तासांमधून वृत्तपत्र वाचण्यासाठी अधिक वेळ काढणे वाचकांसाठी मुश्किल होऊ लागले आहे. या परिस्थितीत विचारांचे वेगळेपण, विषयांचे नावीन्य, परिणामकारक शैली या बळावरच मराठी माध्यमे टिकून राहतील, ’ असे खांडेकर यांनी स्पष्ट केले.
अनुभव विस्तारू द्या
‘मराठीचा अभिमान जरुर बाळगावा. मराठीत भरपूर वाचा, परंतु मराठीपुरते मर्यादीत राहिल्याने स्वत:च्या व्यक्तीमत्त्वाला कुंपण पडते. मराठीसोबतच आणखी भाषांचे ज्ञान घेतल्यास वेगळे विचार सुचतील. कोणत्याही मर्यादा न घालून घेता राज्य, देश, तसेच परदेशातील घटना-घडामोडींचा वेध घेत अनुभवविश्व समृद्ध केले पाहिजे,’ असे मार्गदर्शन खांडेकर यांनी केले.