आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dnyaneshwar And Tukobaray Dindi News In Marathi, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हरिनामाच्या गजरात माउलींची आणि तुकोबारायांची पालखी पुण्यात दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - अखंड उठणारा टाळ-मृदंगांचा नाद, दिंड्या-पताका-ध्वजांचे भार, मस्तकावरच्या तुळशीवृंदावनांचा तोल, अभंगांच्या घोषाची त्यात मिसळलेली लय अशा थाटात आळंदीहून माउलींचा आणि देहूमधून तुकोबारायांचा पालखी सोहळा शनिवारी सायंकाळी पुण्यनगरीत दाखल झाला. दोन्ही पालख्यांचा मुक्काम आता दोन दिवस पुण्यात असून, 24 जून रोजी पहाटे दोन्ही पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतील.

देहूकरांचा निरोप घेऊन तुकोबांची पालखी शनिवारी आकुर्डीहून पुणे-मुंबई महामार्गाने सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पुण्यात दाखल झाली, तर आळंदीहून निघालेली माउलींची पालखीही सायंकाळी साडेसहाला थाटामाटात पुण्यात प्रवेशली. दोन्ही पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुण्याच्या महापौर चंचला कोद्रे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. चौकात पालख्यांच्या स्वागतासाठी स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. पालखीरथ येताच पुष्पवृष्टी करण्यात आली. दिंडीप्रमुखांचे सत्कार करण्यात आले. दुपारी दोन वाजल्यापासूनच वारक-यांचे आगमन शहरात सुरू झाले होते. तुकोबांच्या मुख्य पालखीरथाच्या पुढे 28 तर मागे उर्वरित दिंड्या होत्या. सर्वात पुढे सनईचौघडा निनादत होता. त्यामागे पालखीचे मानाचे अश्व होते. फुलांनी सजवलेल्या चांदीच्या रथात तुकोबांच्या पादुकांची पालखी विराजमान होती. भक्तीचा हा मंगल सोहळा अनुभवण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची गर्दी झाली होती.

भाविकांची मोठी गर्दी
माउलींचा पालखी सोहळा शहरात प्रवेशताना असेच काहीसे दृश्य दिसत होते. वारक-यांनी परस्परांना उराउरी भेटणे, पारंपरिक खेळ, ओठी खेळणा-या अभंगांच्या सुरावटींवर तालात पडणारी पावले..हे देखणे दृश्य नजरेत साठवण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. पालखीमर्गावर ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारल्या होत्या. मंदिरांवर रोषणाई लखलखत होती. प्रत्येक चौकात वैद्यकीय व पोलिस मदत पथक तैनात करण्यात आले होते.

वारक-यांच्या सेवेसाठी डॉक्टर सरसावले
डॉक्टरांच्या विविध संघटना वारीच्या काळात वारक-यांसाठी मोफत वैद्यकीय सेवा पुरवणार आहेत. इतकेच नव्हे तर हे डॉक्टर वारक-यांबरोबर वारीत सहभागी होणार आहेत. वारक-यांना प्रचंड चालावे लागत असल्यामुळे हातापायांना भेगा पडणे, जखमा होणे, हातपाय दुखणे या त्यांच्या नेहमीच्या तक्रारी असतात. अशा तक्रारींवर उपचार करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. स्वारगेटजवळील आयएमए हाऊसमध्ये 22 जून रोजी सकाळी ९ ते 1 या वेळात हे शिबिर होणार आहे. उपचार करून आम्ही वारक-यांना मलमे आणि औषधे मोफत देणार आहोत. हा लांब पल्ला चालत पार करण्यासाठी शरीरातील शक्ती टिकून राहावी, यासाठी ओआरएस पावडरची पाकिटेही देणार आहोत, अशी माहिती पुण्याच्या आयएमएचे अध्यक्ष अरुण हळबे यांनी दिली. दरम्यान, या सेवा मिळणार असल्याने वारक-यांनी आनंद व्यक्त केला आहे.

निमाचे (नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन) डॉक्टर ताराचंद रुग्णालयात आरोग्य शिबिर घेणार आहेत. संघटनेचे 100 डॉक्टर या शिबिरात सहभागी होणार असल्याची माहिती समन्वयक डॉ. मंदार रानडे यांनी दिली. या शिबिरांमध्ये इतर आजारांबरोबरच वारक-यांना धनुर्वाताचे इंजेक्शन देणे, डोळ्यांची तपासणी करण्यात येणार आहे.