आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माउलींचा मुक्काम सासवडला; ज्ञानोबांची पालखी आज जेजुरीकडे तर तुकोबांचे वरवंडकडे मार्गक्रमण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - वारीचा वसा घेतलेल्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीतील वैष्णवांचा मेळा मंगळवारी सायंकाळी उशिरा यवत येथे विसावला, तर माउलींच्या पालखी सोहळ्याने मंगळवारी सासवड येथेच मुक्काम केला होता. बुधवारी सकाळी माउलींचा सोहळा जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ होईल.
पुण्यातून 23 जूनला प्रस्थान ठेवलेली माउलींची पालखी दिवे घाटाची चढण चढून आणि तब्बल 27 किलोमीटरचे अंतर तोडून 23 ला रात्री सासवडला आली. आळंदी ते पंढरपूर या मार्गावरचे आळंदी ते पुणे (21 किमी) आणि पुणे ते सासवड (27 किमी) हे दोनच टप्पे सर्वात मोठे असतात. त्यातही पुणे-सासवड मार्गावर दिवेघाट या सोहळ्याची परीक्षा घेतो कारण संपूर्ण रस्ता चढाचा आहे. त्यामुळे सासवडला माउलींच्या सोहळ्याचा मुक्काम अधिक असतो. थकल्या भागलेल्या वारकर्‍यांना, वाहनांना, जनावरांना जरा विर्शांती घेता यावी, हा उद्देश त्यामागे आहे. त्यानुसार माउलींचा सोहळा मंगळवारीही सासवड येथे होता. आता बुधवारी सकाळी माउलींची पालखी जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ होईल.

वारकरी भजनात दंग
पुण्यातून दोन्ही पालख्या एकत्र निघतात, पण हडपसरपाशी त्यांचे मार्ग भिन्न होतात. माउलींची पालखी उजवीकडे वळून सासवडकडे जाते तर तुकोबांची पालखी सोलापूर रस्त्याने लोणी काळभोरकडून यवतच्या दिशेने निघते. त्यानुसार मंगळवारी तुकोबांची पालखी सकाळी सातच्या सुमारास लोणी काळभोरहून निघाली आणि कुंजीरवाडी फाट्याला पहिली विर्शांती झाली. भाविकांनी न्याहरी येथे उरकली. त्यानंतर थेट उरळीकांचनला दुपारच्या भोजनाला सोहळा थांबला. भोजनोत्तर वारकरी मंडळी भजन, कीर्तन, खेळात रमली. मग सायंकाळी पाचच्या सुमारास जानजीबुवाची वाडी येथे अल्प विर्शांती घेऊन सोहळा मुक्कामासाठी यवत येथील भैरवनाथ मंदिरात पोचला. बुधवारी तुकोबांचा पालखी सोहळा वरवंडकडे मार्गक्रमण करेल.

छायाचित्र : लोणी काळभोरहून निघालेली संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांची पालखी मंगळवारी मजल- दरमजल करत रात्री यवतला पोहोचली. तिथेच वारकर्‍यांनी मुक्काम केला. दरम्यानच्या प्रवासात मुखी हरिनाम व ग्यानबा- तुकारामचा जयघोष करत वारकरी भक्तीरसात दंग झाले होते. प्रवासादरम्यान प्रत्येक ठिकाणी पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची एकच झुंबड उडत होती.