आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माउलींचा विसावा सासवडला, तर तुकोबांच्या पालखीचा विश्राम यवतमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ज्ञानेश्वर माउली आणि संत तुकोबारायांच्या पालख्यांनी गुरुवारी पुण्याच्या ग्रामीण भागात प्रवेश केला. रिमझिम पावसाच्या सरी आणि पावसाळी हवेमुळे पालखी सोहळ्यातील हजारो वारक-यांचा दिवस आनंदात गेला. दोन्ही पालखींच्या दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोक थांबले होते.


दिवेघाटाची अवघड वाट चढल्यानंतर माउलींच्या पालखीने गुरुवारी दिवसभर सासवड येथे मुक्काम केला. सासवड मुक्कामी वारकरी दिवसभर भजन-कीर्तनात दंग झाले होते. सकाळी जानकर दिंडीचे कीर्तन झाले, तर सायंकाळी वालकर दिंडीने कीर्तन केले. संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपान महाराज यांची समाधी सासवडमध्ये आहे. तेथून सोपान महाराजांच्या पालखीने आज पंढरीकडे प्रस्थान ठेवले. तत्पूर्वी सोपान महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी माउलींच्या पालखीतील वारक-यांनी गर्दी केली.


हडपसरमधून पुण्याबाहेर पडलेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आज दिवसभर प्रवास केला. लोणी काळभोरचे सरपंच व इतर मानक-यांच्या उपस्थितीत पादुकांचे पूजन झाले. त्यानंतर पालखीने प्रस्थान ठेवले. कुंजीरवाडी, उरळी कांचन, जावजीबुवाची वाडी या गावांमधून पुढे जात रात्रीच्या मुक्कामाला पालखी यवत येथे पोहोचली. ठिकठिकाणी सरंपचांकडून पालखीचे दर्शन घेतले जात होते.


माउली आज जेजुरीत
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा शुक्रवारी सकाळी बोरावके मळ्यात विसावा घेईल. त्यानंतर यमाई शिवरी येथे दुपारचा नैवेद्य होईल. रात्रीच्या मुक्कामाला पालखी जेजुरीत असेल.


तुकोबा आज वरवंडला
संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा शुक्रवारी दुपारचा विसावा भांडगाव येथे होईल. तिसरी विश्रांती केडगाव चौफुला येथे, तर रात्रीचा मुक्काम वरवंड येथील विठ्ठल मंदिरात असेल.