आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Do Not Stop Raj Thackeray In Pune Says Sharad Pawar To NCP Activist

शरद पवार यांच्या सल्ल्यानंतर पुण्याचा ‘राज’मार्ग खुला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ‘सात मार्चला पुण्यात येतोय... असेल हिंमत तर अडवा’ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसला दिलेल्या प्रतिआव्हानानंतर पुण्यात तणाव निर्माण होण्याची चिन्हे होती. परंतु राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्थानिक नेत्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. त्यामुळे राज यांना पुण्यात अडवले जाणार नसल्याचे पक्षाच्या शहराध्यक्ष व खासदार वंदना चव्हाण यांनी रविवारी पत्रकाद्वारे जाहीर केले.
उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी ‘राज यांनी पुण्यात येऊनच दाखवावे’ असे आव्हान दिले होते. शनिवारी जालन्यातील सभेत राज यांनी हे आव्हान स्वीकारत 7 तारखेला येत असल्याचे जाहीर केले होते. मात्र राजकीय वाद टोकाला जाऊ नयेत म्हणून शरद पवारांनीच रविवारी हस्तक्षेप केला.
पवार यांच्या पुण्यातील मोजक्या निकटवर्तीयांमध्ये काकडे यांचा समावेश आहे. पवार यांनी स्वत: काकडे यांच्याशी संवाद साधला. ‘पक्षाला सर्वच बाजूंनी घेरण्याचे प्रयत्न सध्या सुरू असताना यात आपणहून भर घालायला नको. कोणाला काय बोलायचे ते बोलू दे. आपल्या अडचणी आपण वाढवायला नको,’ या शब्दात पवार यांनी काकडे यांना समजावले. त्यामुळे काकडे यांच्यापुढे माघारीशिवाय मार्ग उरला नाही. यानंतर पवार यांनी खासदार चव्हाण यांना खुलासा करणारे पत्रक काढण्यास सांगितले.

झुंडशाही प्रवृत्तीचा निषेध
‘काही मंडळी बेभानपणे वक्तव्ये करून जनतेच्या मनात विष पेरण्याचे काम करत आहेत. युवकांना विकासाची योग्य दिशा दाखविण्याऐवजी घरात घुसून तोडफोड करून रक्तपात करा’, अशी भाषा करत आहेत. अशी भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी नाही. या झुंडशाही प्रवृत्तीचा धिक्कार आणि निषेध व्यक्त करतो,’ असे पत्रक चव्हाण यांच्या सहीने काढण्यात आले आहे. ‘आमच्या पक्षावर आणि नेत्यांवर खालच्या पातळीवर केलेल्या टीकेमुळे आमच्या काही मंडळींनी चिडून राज यांना पुण्यात येऊ न देण्याची भूमिका घेतली होती,’ अशा शब्दात काकडे यांचे समर्थनही करण्यात आले.

दिवस बरे नाहीत
राज यांच्या वक्तव्यानंतर मनसे-राष्टÑवादीत सुरू झालेल्या संघर्षात नमते घेण्याची सूचना शरद पवार यांनी केली. ‘वाद ओढवून न घेता शांत रहा... सध्या दिवस बरे नाहीत,’ अशा सूचक शब्दात पवार यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘स्वत: पवार साहेबांच्या सूचनेनुसार राज ठाकरे यांना आमच्या पक्षाचे कार्यकर्ते कुठेही जाण्यास अडवणार नाहीत. पुण्यातील राष्टÑवादीचे कार्यकर्ते भडकावू वृत्तीला संयमाने सामोरे जातील,’ असे जाहीर करीत राष्ट्रवादीने या प्रकरणावर पडदा टाकला आहे.

पिचड यांच्या गावात पाळला बंद
अकोले:जालना येथील सभेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार मधुकर पिचड यांच्यावर शिवराळ टीका केल्याच्या निषेधार्थ पिचड यांच्या राजूर या मूळ गावात रविवारी बंद पाळण्यात आला. ग्रामस्थांनी मोर्चा काढून बसस्थानकावर ठिय्या आंदोलन केले. राज यांचा पुतळा जाळण्यापूर्वी पोलिसांनी हस्तक्षेप करून तो ताब्यात घेतला़ त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.