आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. शरच्चंद्र गोखले यांचे पुण्यात निधन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. शरच्चंद्र गोखले यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
डॉ. गोखले यांनी विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थांचे काम पाहिले. तसेच त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.
कास्प, आंतरराष्ट्रीय कुष्ठनिवारण संस्था (आयएलयू) व आंतरराष्ट्रीय दीर्घायू केंद्र (आयएलसी) या संस्थांचे ते संस्थापक अध्यक्ष होते. युनायटेड नेशन्स, यूनिसेफ, डब्ल्यूएचओ या आंतरराष्ट्रीय संस्थात सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले. या निमित्ताने त्यांनी श्रीलंका, बांगलादेश, फिलिपाइन्स, कोरिया, नेपाळ या देशांत काम केले.
भारत सरकारच्या वयोवर्धन धोरण समितीचे सभासद, भारतीय समाजकल्याण संस्थेच्या प्रमुखपदी नेमणूक, भारत सरकारचे सल्लागार, आंतरराष्ट्रीय समाजकल्याण संस्थेच्या आशिया आणि पॅसिफिक विभागाचे प्रमुख तसेच असिस्टंट सेक्रेटरी जनरल म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
गोखले यांनी मराठी आणि इंग्रजीत एकूण ४५ पुस्तके लिहली आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांचे चिनी आणि फ्रेंच भाषेत भाषांतर करण्यात आले आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. गोखले यांनी केसरी व अन्य तीन इंग्रजी मासिकांचे संपादक म्हणून काम पाहिले होते.
'यूनो'ला संबोधित करण्यासाठी युनोच्या तत्कालिन सरचिटणीसांनी गोखले यांना निमंत्रण दिले होते. हा सन्मान मिळवणारे जे. आर. डी. टाटा यांच्यानंतर डॉ. गोखले हे दुसरे भारतीय ठरले होते. राष्ट्रपतींच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कारही गोखले यांना मिळाला होता. याचबरोबर अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
छायाचित्र (संग्रहित) - एका कार्यक्रमादरम्यान डॉ. गोखले आपल्या पत्नीसह....