आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Narendra Dabholkar Sencond Murderer Sketch Releases

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी दुस-या आरोपीचेही रेखाचित्र जारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन दोन आठवडे उलटले तरी अद्याप मारेक-यांचा शोध न लागल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व सीसीटीव्ही फुटेजच्या साह्याने पोलिसांनी आता दुस-या आरोपीचेही रेखाचित्र सोमवारी जारी केले. हे दोन्ही आरोपी 25 ते 28 वयोगटातील असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त राजेश बनसोडे व तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र्र भामरे यांनी सांगितले की, दुसरा हल्लेखोर पळून जाताना दुचाकीवर मागील बाजूस बसला होता. प्रत्यक्षदर्शींनी केलेल्या वर्णनानुसार त्याने मिलिटरी रंगाची टोपी व निळ्या रंगाचा शर्ट घातला होता. त्याचे केस खांद्यापर्यंत वाढवलेले असून बारीक मिशी आहे.
अहवाल दोन दिवसांत
या प्रकरणात पोलिसांना आणखी दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळाले आहेत. तसेच घटनास्थळ परिसरात सात सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी वेगाने मोटारसायकलवर जाताना चित्रित झालेले आहे. परंतु त्याचे चेहरे व दुचाकीचा क्रमांक
फुटेजमध्ये स्पष्ट दिसत नाही. आरोपींचे चेहरे अस्पष्ट दिसत असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासणीसाठी लंडनला पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल दोन दिवसात येणे अपेक्षित आहे. तसेच बॅलेस्टिक अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झालेला नाही.
भामरे म्हणाले, डॉ. दाभोलकर यांच्या कुटुंबीयांशी साता-याला जाऊन सविस्तर चौकशी केली आहे. त्यात पोलिसांना विविध पैलू मिळाले असून त्यावर तपास केंद्रित करण्यात आला आहे. तसेच बाहेरगावी जी तपास पथके गेली होती, त्यांच्याकडूनही काही महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त करण्यात आली आहे. परंतु तपास कामात अडथळे नको म्हणून ती जाहीर करता येत नाही.
पोलिसांनी तपासकामी परराज्यातील पोलिसांचीही मदत घेतली आहे. या प्रकरणी कोणत्याही एका संघटनेला अथवा व्यक्तीला पोलिसांनी लक्ष्य केलेले नाही.
गणेशोत्सवापूर्वी तपास पूर्ण !
डॉ.दाभोलकर यांची हत्या नियोजित कटाचा एक भाग असून तपासाची व्याप्ती मोठी आहे. तपासाला उशीर होत नसून विविध तपास पूर्ण करण्यासाठी त्याला मूलभूत वेळ लागत आहे. तपासातील अनावश्यक काही गोष्टी वगळल्या जात असून पोलिस योग्य मार्गावरच आहेत, असा दावा भामरे यांनी केला. दरम्यान, गणेशोत्सवापूर्वी तपास पूर्ण होणार असल्याच दावा पोलिस दलातील सूत्रांनी केला.
आरोपी 25 ते 28 वयोगटातील
प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व सीसीटीव्ही फुटेजच्या साह्याने पोलिसांनी आता दुस-या आरोपीचेही रेखाचित्र सोमवारी जारी केले. हे दोन्ही आरोपी 25 ते 28 वयोगटातील असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
घटनास्थळी पाळत, साक्षीदारांना आवाहन
घटनास्थळ परिसरात मागील 12 दिवसांपासून रोज सकाळी पोलिस विविध व्यक्तींवर पाळत ठेवत आहेत. मागील दहा दिवसांपासून पोलिस चौकशी करत असल्याचे पाहून एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मदतीसाठी पुढे आला आहे. त्याच्याकडून काही माहिती मिळाली आहे. अन्य प्रत्यक्षदर्शींनीही पुढे येऊन माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.