आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Narendra Dabholkar Murder Case No Tress To Maharashtra Police

डॉ. दाभोलकरांचे मारेकरी 72 दिवसांनंतर मोकाटच; हल्लेखोरांच्या शोधार्थ पोलिस कर्नाटकात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


पुणे- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येस 78 दिवस उलटले, मात्र अद्याप त्यांच्या मारेकर्‍यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून पोलिसांवरही दबाव वाढत आहे. पोलिसांनी आता तपासाची दिशा कर्नाटक सीमेवर वळवली असून या भागातील विविध संशयितांची चौकशी केली जात आहे. गुन्हे शाखेचे एक पथक मागील आठवड्यापासून या कामगिरीवर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी 34 पथके गेल्या अडीच महिन्यांपासून राज्याच्या कानाकोपर्‍यात फिरत आहेत. दहशतवाद विरोधी पथक, गुन्हे अन्वेषण विभाग, गुप्तचर खाते तसेच इतर शासकीय संस्था त्यांना सहकार्य करत आहे, तरीही अद्याप धागेदोरे हाती लागलेले नाहीत. कर्नाटक सीमाभागात गेलेल्या पथकाच्याही हाती अद्याप ठोस काहीच लागलेले नाही.

सर्वच प्रयत्न फोल
तपास पथकांनी आतापर्यंत 3 हजार जणांची कसून चौकशी केली. घटनास्थळ व परिसरातील 171 सीसीटीव्हींचे फुटेज तपासले. हल्लेखोरांनी काळय़ा रंगाची व 7756 क्रमांकाची दुचाकी वापरल्याची माहिती मिळाल्याने अशा हजारो वाहनांची राज्यभर तपासणी केली, जुन्या गाड्यांची खरेदी-विक्री करणार्‍यांकडेही तपासणी केली. विविध भोंदूबाबा, बोगस डॉक्टर, जात पंचायत सदस्य, वेगवेगळ्या संस्थाचे कार्यकर्ते, सराईत गुन्हेगार यांचे जबाब नोंदवले. घटनास्थळ परिसरातील 600 नागरिकांकडे अनेकदा चौकशी केली मात्र सारेच व्यर्थ ठरले.

भाषेची अडचण
दुसर्‍या राज्यात खबर्‍यांचे कमकुवत जाळे व भाषेची अडचण हे अडथळे पार करत काही महत्त्वपूर्ण गोष्टी मिळतात का? याची चाचपणी करणे पोलिसांसमोर आव्हान आहे. या तपासकामी इतर राज्यात गेलेली पथके परतली असून पोलिस सध्या महाराष्ट्रासह कर्नाटक सीमाभागातच काही धागेदोरे मिळतात का? यावर लक्ष देऊन आहेत.