आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Shrikar Pardeshi Finally Become Victim Of Nationalist Congress, Transfered

राष्ट्रवादीची \'खेळी\', बुलडोजर मॅन डॉ. श्रीकर परदेशींची अखेर बदली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - बहुचर्चित सनदी अधिकारी, पिंपरी- चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची अखेर शुक्रवारी बदली करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील बेकायदा बांधकामांविरोधात कडक अंमलबजावणी सुरू केल्यामुळे राष्‍ट्रवादीच्या स्थानिक आमदारांनी परदेशींच्या विरोधात रान उठवले होते. त्यांच्याच दबावातून अखेर परदेशींची मुदतपूर्व बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. ते आता मुद्रांक शुल्क विभागाचे महानिरीक्षक म्हणून कार्यभार पाहतील.
न्यायालयाच्या आदेशानंतर परदेशी यांनी पिंपरी-चिंचवडमधील बेकायदा इमारती पाडण्यास सुरुवात केली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्‍ट्रवादी कॉँग्रेसची पिंपरी- चिंचवडच्या महापालिकेत सत्ता आहे. राष्‍ट्रवादीच्या स्थानिक पदाधिका-यांच्याच आशीर्वादाने उभ्या राहिलेल्या बेकायदा बांधकामांविरुद्ध परदेशींनी सुरू केलेल्या कारवाईमुळे अनेकांचे हितसंबंध दुखावले. जनतेच्या रोषामुळे पिंपरी-चिंचवडमधल्या विधानसभेच्या तीन आणि लोकसभेची एक जागा धोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागली. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही परदेशींची उचलबांगडी करण्यासाठी ताकद पणाला लावली. परिणामी अवघ्या अठरा महिन्यांतच परदेशी यांना पिंपरी-चिंचवडमधून काढता पाय घ्यावा लागला.
जनतेचा भक्कम पाठिंबा- परदेशी यांच्या बदलीसाठी राष्‍ट्रवादीच्या आमदारांनी हिवाळी अधिवेशनात राजीनामा देण्याची धमकी दिली होती. तेव्हाच परदेशी यांच्या बदलीच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, पिंपरी-चिंचवडमधल्या विविध संघटनांनी या प्रामाणिक अधिका-यासाठी आवाज उठवण्यास सुरुवात केली. परदेशी यांची बदली होऊ नये, या मागणीसाठी स्वाक्षरी मोहिमा, मोर्चे, मुख्यमंत्र्यांना पत्रे आदी उपक्रम हाती घेतले गेले. सोशल मीडियावरही मोहीम राबवण्यात आली. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, गजानन बाबर, राष्‍ट्रवादीचे नेते आझम पानसरे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून बदलीला विरोध दर्शवला होता.
राजकीय दबाव झुगारला- नांदेड जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाजात वेगळी चुणूक दाखवलेल्या परदेशी यांनी पिंपरी-चिंचवडमध्येही अल्पावधीत प्रशासकीय घडी बसवण्याचे काम केले होते. शिस्तबद्ध कारभारामुळे महापालिकेतील कामचुकार अधिका-यांचे धाबे दणाणले होते. बेकायदा इमारती पाडताना परदेशी यांनी कोणत्याच दबावाला भीक घाती नव्हती. महापालिकेतील अधिका-यांच्या बेकायदा बांधकामावरच त्यांनी पहिल्यांदा हातोडा चालवून सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जिंकला होता.
पवारांनी दिले होते संकेत- ‘गेली नऊ वर्षे पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये चांगले अधिकारी आणतोय. डॉ. परदेशी यांना मीच नांदेडहून आणले,’ असे अजित पवार यांनी सांगितले होते. ‘मग आता बदली का करत आहात? तुमच्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्या नाहीत का?’ असा प्रश्न पत्रकारांनी करताच पवार चिडले होते. ‘परदेशींची बदली ही प्रशासकीय बाब आहे. अधिका-यांची बदली करणे हा सरकारचा अधिकार आहे. त्यांच्या बदलीबाबत मी कोणतीही हमी देऊ शकत नाही,’ असे सांगून त्यांनी परदेशींच्या बदलीचे संकेत दिले होते.
अण्णांच्या पवित्र्याकडे लक्ष- डॉ. परदेशी यांच्या संभाव्या बदलीला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून परदेशींची मुदतपूर्व बदली झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. अण्णांच्या या भूमिकेला पिंपरी-चिंचवडमधून जोरदार प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता हजारे काय भूमिका घेतात याकडे पिंपरी-चिचंवडकरांचे लक्ष लागले आहे.
राष्‍ट्रवादीकडून दुसरा ‘बळी’- यापूर्वी बीडचे कर्तव्यतत्पर जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांचीही राष्‍ट्रवादीच्या नेत्यांच्या दबावामुळेच मुदतपूर्व बदली करण्यात आली होती. तेव्हाही बीडमधील जनतेने या अन्याय बदलीविरोधात आवाज उठवून सत्ताधा-यांना चांगलेच धारेवर धरले होते. थेट मुख्यमंत्र्यांपर्यंतही तक्रारी गेल्या होत्या. या दबावामुळे एकदा केंद्रेकर यांची बदली रद्दही करण्यात आली, दुस-यांदा मात्र राष्‍ट्रवादीच्या नेत्यांनी डाव साधून त्यांना औरंगाबादेत धाडलेच.