आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Narendra Dabholkar News In Marathi, Commissioner Gopal Pol

आशिष खेतानविरोधात शंभर कोटींचा दावा!, आयुक्त गुलाब पोळ यांची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी प्लँचेट केल्याचा दावा करणारे आऊटलूक मासिकाचे संपादक कृष्णप्रसाद व पत्रकार आशिष खेतान यांच्यावर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती पुण्याचे माजी पोलिस आयुक्त गुलाब पोळ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी पोळ यांचे वकील हर्षद निंबाळकर उपस्थित होते.

पोळ म्हणाले, डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी आपण निवृत्त सहायक पोलिस आयुक्त व वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदावरील 40 जणांना सहभागी करून घेतले होते. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने निवृत्त अधिकार्‍यांचा अनुभव व पुणे परिसरातील माहिती असलेल्या अधिकार्‍यांचा तपास पथकात सहभाग होता. यामध्ये माजी एसीपी आभीणकर यांचाही सहभाग होता. मात्र, त्यांच्या माध्यमातून आपण कधीही निवृत्त पोलिस कर्मचारी मनीष ठाकूर यांना भेटलो नाही. ठाकूर व आपला कोणताही संबंध नसून तांत्रिक-मांत्रिक गोष्टीवर माझा विश्वास नाही.
कोल्हापूर येथे खेतान व माझी भेट झाली होती. तेव्हा त्यांचा हेतू वेगळा असल्याचे मला जाणवले होते. त्या वेळी मी त्यांना चुकीची माहिती छापू नये, नाही तर मला कायदेशीर कारवाई करावी लागेल, असे सांगितले होते. खेतान यांनी लिहिलेला लेख हा खोटा असून तो चीप पब्लिसिटीसाठी केलेला खटाटोप आहे. याप्रकरणी आऊटलूकचे संपादक व खेतान यांना नोटीस पाठवल्याचे त्यांनी सांगितले.
100 कोटींचाच दावा का?
अ‍ॅड.निंबाळकर म्हणाले, गुलाब पोळ यांनी 1981 मध्ये औरंगाबाद येथे डीवायएसपी म्हणून कारकीर्दीची सुरुवात केली. त्यांना शिवछत्रपतीसह अनेक पुरस्कार मिळाले असून पद्मश्रीसाठीही त्यांची शिफारस झाली होती. विशेष पोलिस महासंचालक म्हणूनही काम केले आहे. आरोपांमुळे त्यांची बदनामी झाली असून निवृत्तीनंतरच्या करिअरचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कमाल नुकसान भरपाई मागण्यात आली आहे.

माझ्याविरोधात तपास होऊ द्या
आऊटलूक प्रकरणानंतर अंनिसने पोळ यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी खातेनिहाय चौकशीचा अहवाल मागितला आहे. मात्र अद्याप याबाबत आपणास कोणीही संपर्क केला नसल्याचे पोळ यांनी सांगितले. माझ्याविरोधात तक्रार दाखल असल्यास मी असहकार्य करण्याचा संबंधच नाही. गरज असल्यास माझीही चौकशी होऊ द्या, असेही त्यांनी सांगितले. डॉ. दाभोलकर तपास सीबीआयकडे हस्तांतरित झाल्याने त्यावर आपण भाष्य करणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.