आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Narendra Dabholkar Murder Case, Ashish Khetan Publically Open Sting Operation Video

पोळ यांनी 100 कोटींचा दावा ठोकताच खेतानकडून स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ सार्वजनिक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र स्त्रोत- स्कायसॉफ्ट)
पुणे- डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी प्लँचेट केल्याचा दावा करणा-या पत्रकार आशिष खेतान यांच्यावर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करताच खेतान यांनी आज स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ सार्वजनिक केला.
पुणे पोलिस दलातील निवृत्त हवालदार मनीष ठाकूरच्या मदतीने जादूटोणा करून दाभोलकरांच्या आत्म्याशी संवाद साधल्याचे गुलाबराव पोळ आशिष खेतान यांना सांगताना व्हिडिओत स्पष्ट दिसत आहेत. यासाठी तत्कालीन एसीपी रणजित अभ्यंकर यांची मदत घेतल्याचे व्हिडिओत सांगताना दिसत आहे. त्यामुळे कालपर्यंत प्लॅंचेट केल्याचा दावा फेटाळणा-या पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त राहिलेल्या गुलाबराव पोळ यांची पुरोगामी महाराष्ट्रासमोर पोलखोल उघड झाली आहे.
गुलाबराव पोळ यांनी सोमवारी आपले वकील हर्षद निंबाळकर यांना सोबत घेऊन पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी पत्रकार आशिष खेतान व आऊटलूक मासिकाचे संपादक कृष्णप्रसाद यांच्यावर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे जाहीर केले. पोळ यांच्यावर आरोप झाल्यामुळे त्यांची बदनामी झाली असून निवृत्तीनंतरच्या करिअरचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कमाल नुकसान भरपाई मागण्यात आली आहे, असे पोळ यांचे वकिल अॅड. हर्षद निंबाळकर यांनी सोमवारी सांगितले होते.
दाभोलकरांच्या मारेक-यांना शोधण्यासाठी आपण कोणत्याही तंत्र-मंत्राचा व प्लॅंचेटचा वापर केला नव्हता असे सांगत खेतान यांचे सर्व आरोप पोळ यांनी फेटाळले होते. मात्र, खेतान व आऊटलूकवर 100 कोटींचा दावा ठोकण्याचा निर्णय घेताच आज खेतान यांनी गुलाबराव पोळ व मनीष ठाकूरचा दाभोलकरांच्या आत्म्याशी संवाद साधतानाचा व्हिडिओ सार्वजनिक केला. आऊटलूकमध्ये लेख लिहण्याच्या अगोदरच खेतान यांनी या व्हिडिओसह स्टिंग ऑपरेशन करण्यात यश मिळवले होते.
आऊटलूक प्रकरणानंतर अंनिसने पोळ यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी खातेनिहाय चौकशीचा अहवाल मागितला आहे. मात्र अद्याप याबाबत आपणास कोणीही संपर्क केला नसल्याचे पोळ यांनी सांगितले होते. माझ्याविरोधात तक्रार दाखल असल्यास मी असहकार्य करण्याचा संबंधच नाही. गरज असल्यास माझीही चौकशी होऊ द्या, अशा वल्गनाही पोळ यांनी कालच केल्या होत्या. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी आपण निवृत्त सहायक पोलिस आयुक्त व वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदावरील 40 जणांना सहभागी करून घेतले होते. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने निवृत्त अधिकार्‍यांचा अनुभव व पुणे परिसरातील माहिती असलेल्या अधिकार्‍यांचा तपास पथकात सहभाग होता. यामध्ये माजी एसीपी अभ्यंकर यांचाही सहभाग होता. मात्र, त्यांच्या माध्यमातून आपण कधीही निवृत्त पोलिस कर्मचारी मनीष ठाकूर यांना भेटलो नाही. ठाकूर व आपला कोणताही संबंध नसून तांत्रिक-मांत्रिक गोष्टीवर माझा विश्वास नाही.

खेतान यांच्या भेटीबाबत पोळ यांनी सांगितले होते की, कोल्हापूर येथे खेतान व माझी भेट झाली होती. तेव्हा त्यांचा हेतू वेगळा असल्याचे मला जाणवले होते. त्यावेळी मी त्यांना चुकीची माहिती छापू नये, नाही तर मला कायदेशीर कारवाई करावी लागेल, असे सांगितले होते. खेतान यांनी लिहिलेला लेख हा खोटा असून तो चीप पब्लिसिटीसाठी केलेला खटाटोप आहे. त्यामुळेच आपण आऊटलूकचे संपादक व खेतान यांना नोटीस पाठवल्याचे पोळ यांनी सोमवारी सांगितले होते. गुलाबराव पोळ यांनी 1981 मध्ये औरंगाबाद येथे डीवायएसपी म्हणून कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्यांना शिवछत्रपतीसह अनेक पुरस्कार मिळाले असून पद्मश्रीसाठीही त्यांची शिफारस झाली होती. विशेष पोलिस महासंचालक म्हणूनही काम केले आहे. तीन महिन्यापूर्वी पोळ यांनी पोलिस दलातून स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.