आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Narendra Dabholkar Murder Case, Ashish Khetan Publically Open Sting Operation Video

स्टिंग ऑपरेशन: प्लँचेटचे ‘भूत’ पोळांच्या मानेवर; कबुलीचा व्हिडिओ प्रसिद्ध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकर्‍यांचा शोध घेण्यासाठी तंत्र-मंत्राचा वापर केल्याचा आरोप माजी पोलिस आयुक्त गुलाब पोळ यांनी धुडकावून लावला असला तरी, पत्रकार आशिष खेतान यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही कबूली दिल्याचे फूटेज आता समोर आले आहे. या स्टिंग ऑपरेशनद्वारे पोळ यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांना पुष्टी मिळते. याप्रकरणी पोळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

जून महिन्यात खेतान यांनी घेतलेल्या मुलाखतीत पोळ यांनी मारेकर्‍यांचा शोध घेण्यासाठी प्लँचेटचा आधार घेतल्याचे वृत्त ‘आऊटलूक’ या मासिकात प्रसिद्ध झाले होते. त्यावरून पोळ व पोलिस खात्यावर टीकेची झोड उठली. मात्र असे काही घडलेच नाही, असे सांगत पोळ यांनी पत्रकार खेतान व त्यांच्या मासिकावर 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, या प्रकारानंतर दुसर्‍याच दिवशी खेतान यांनी पोळ यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा व्हिडिओच मंगळवारी सार्वजनिक केल्यानंतर मात्र पोळ यांचे पितळ उघडे पडले.
निवृत्त पोलीस कर्मचारी मनीष ठाकूर याच्या माध्यमातून हे प्लॅँचेट करण्यात आल्याची कबुली पोळ यांनी दिल्याचे या व्हिडिओतून स्पष्ट होते. खेतान यांनी जून महिन्यात हे स्टिंग ऑपरेशन केले होते. यामध्ये निवृत्त सहायक पोलिस आयुक्त रणजित अभ्यंकर यांचे माध्यमातून आपण ठाकूरची भेट घेतल्याची कबुली पोळ यांनी दिली आहे.

पुरावे देईन : खेतान
खेतान म्हणाले, चौकशीत दिलेल्या माहितीनंतर काही लोक पालटतील याची मला जाणीव होती. याकरिता मी सर्व फोन कॉल्स व स्टिंग ऑपरेशनचे सहा ते सात तासांचे ऑडिओ, व्हिडिओ रेकर्ॉडिंंग केलेले आहे. ठाकूर याने मृत व्यक्तींशी बोलत असल्याचे नाटक माझ्यासमोर केले असून त्याचे रेकॉर्डिंग आहे. ठाकूरला आपण ओळखत नसल्याचे पोळ खोटे सांगत आहेत. अशी बातमी छापू नये याकरिता त्यांनी मला इशारा दिल्याची कबुली त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. तपासकामी पोळ यांनी काळ्या जादूचा वापर केला आहे. या प्रकरणाची नि:पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. या चौकशीत मी सर्व व्हिडिओ फुटेज देईन.

फुटेजमधील ‘ती’ तरुणी कोण?
खेतान यांनी पोळ यांना भेटण्यापूर्वी दौंड येथे मनीष ठाकूर याची भेट घेतली. त्या वेळी ठाकूर याने डॉ. दाभोलकर यांच्या आत्म्याशी आपण बोलत असल्याचा व्हिडिओ खेतान यांनी चित्रीत केला आहे. त्यानुसार डॉ. दाभोलकर यांचा आत्मा म्हणाला, ‘मी फिरायला जाण्याचा रस्ता कॉलेजकडे जातो. मारेकर्‍यांनी मारण्यापूर्वी मला, आवाज दिला दाभोलकर.... दाभोलकर त्यानंतर मी पाठीमागे वळून पाहिले असता, 15 सेकंदांत मारेकर्‍यांनी गोळीबार केला. मी क्षणार्धात खाली कोसळून पडलो. त्यानंतर मारेकर्‍यांनी माझ्यावर गोळ्या झाडल्या. माझे शरीर थंड पडलेले दिसताच मारेकरी पुलापर्यंत पळत गेले. तिथे एक तरुणी उभी होती, तिला एक बॅग देऊन ते पसार झाले. सदर तरुणीने काही घडलेच नाही अशा आविर्भावात कॉलेजला निघून गेल्याचे नाटक केले.

नगर, औरंगाबादेतही तपास
मनीष ठाकूर याने अशाच प्रकारे एटीएसलाही आरोपी मिळण्यासाठी मदत केली असून औरंगाबाद, अहमदनगर येथे तो एटीएस पथकाला घेऊन गेलेला आहे. डॉ. दाभोलकर प्रकरणातील संशयित शस्त्रविक्री करणारा मनीष नागोरी यानेही ठाकूर याने आपली पोलिस कोठडीदरम्यान चौकशी केल्याची कबुली दिली आहे, असे खेतान म्हणाले.

इतर यंत्रणांकडून तपास करा, डीआयजींना पत्र
प्लँचेटप्रकरणी पुण्याचे सहपोलिस आयुक्त संजय कुमार यांनी पोलिस महासंचालकांना एक पत्र पाठवले आहे. या प्रकरणातील आरोप एकट्या पोळ यांच्यावर केवळ नसून ते पुणे पोलिीसांवरही झालेले आहेत. त्यामुळे याबाबतची चौकशी पुणे पोलिसांकडून न करता अन्य तपास यंत्रणेमार्फत करावी, अशी मागणी संजयकुमार यांनी पत्रात केली.