आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Dabholkar Murder Case, Planchette, News In Marathi

पोळ, गृहमंत्र्यांनी अडकवले; डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपी विकास खंडेलवालची तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- प्लॅँचेट प्रकरणाबाबतचे स्टिंग ऑपरेशन उघड झाल्यानंतर आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी विकास खंडेलवाल याने गृहमंत्री आर.आर.पाटील, तत्कालीन पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ व तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी आपणास खोट्या गुन्ह्यात अडकवल्याची तक्रार पुणे पोलिस आयुक्त सतीश माथूर यांच्याकडे केली आहे.

खंडेलवालचे वकील अ‍ॅड. बी. ए. अलूर यांनी सांगितले की, या तक्रारीत बनावट अहवालान्वये गुन्हा दाखल करणे, डांबून ठेवणे, फसवणूक करणे, प्रतिष्ठेस हानी पोहोचवण्यासाठी खोटी कागदपत्रे तयार करणे, शारीरिक व मानसिक छळ करणे, हत्येसारख्या खोट्या फौजदारी खटल्यात गुंतवणे तसेच जादूटोण्याच्या उद्देशाने अनिष्ट व अघोरी प्रथेने पुरावे गोळा केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी दोषींवर जादूटोणा कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात यावी तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य मांडावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

खंडेलवालने सांगितले की, मी नागोरीसोबत 18 सप्टेंबर 2013 रोजी मुंब्रा येथे गेलो. 20 सप्टेंबर रोजी तिथे हॉटेलमध्ये नाष्टा करत असताना पोलिसांनी आम्हास अटक करून खंडणीच्या केसमध्ये अडकवले. त्यानंतर डॉ. दाभोलकर प्रकरणात एटीएसने ताब्यात घेऊन आमची सखोल चौकशी केली व मनीष नागोरीसह मला खोट्या केसेसमध्ये गुंतवण्याचा इशारा दिला. 29 सप्टेंबर रोजी पोळ व भामरे यांनी आमच्याकडे चौकशी करून गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या सांगण्यानुसार लवकरात लवकर या प्रकरणावर पडदा पाडायचा दबाव असल्याचे सांगितले.

पोलिस कस्टडीत छळ
एसीपी भामरे व चतु:शृंगी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरुण वालतुरे यांनी युनिट चारच्या कार्यालयात झालेला प्रकार कुणालाही सांगू नका, तुम्हाला दाभोलकरांच्या प्रकरणात अटक करणार नाही, असे आश्वासन दिले. 21 ऑक्टोबर 2013 रोजी एटीएस प्रमुख राकेश मारिया यांनी दाभोलकर केस अंगावर घेण्यासाठी पैशांची लालूच दाखवली होती व आम्ही लोकांना ते कोर्टात सांगितले. त्यानंतर आम्हाला कस्टडीत खूप त्रास देण्यात आला. त्यानंतर पोळ व भामरे यांनी आम्हाला न्यायालयात भेटून तुमच्याविरोधात कोणताही पुरावा नसून गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार तुम्हाला अटक केल्याचे सांगितले.

प्लँचेटचा प्रकार आपल्यासमोरच झाल्याचा खंडेलवालचा दावा
खंडेलवालने अर्जात म्हटले की, पोळ व भामरे यांनी आमची तीन तास चौकशी केली. त्या वेळी त्यांच्यासोबत एक व्यक्ती आली होती. त्याने अधिकाºयांच्या सांगण्यानुसार मंत्रतंत्र सुरू केले. त्यानंतर त्याने सांगितले की, माझ्या शरीरात दाभोलकरांच्या आत्म्याने प्रवेश केला आहे. त्याने माझी व नागोरीची नक्षत्र, रास, जन्मतारीख विचारली. नंतर त्याने दाभोलकरांचा खून मुंबईवरून येऊन केला, असे सांगितले. त्या वेळी पोळ यांनी सदर व्यक्तीशी वार्तालाप केला. सर्व संभाषण राजेंद्र भामरे यांच्या सांगण्यानुसार पोलिस लिहून घेत होते. त्यानंतर त्याने सांगितले की, ‘हे माझे मारेकरी आहेत.’ प्लँचेट प्रकरण वर्तमानपत्रात आल्यावर ती व्यक्ती मनीष ठाकूर असल्याचे मी ओळखले. त्यानेच मंत्र-तंत्राच्या साहाय्याने आम्हाला दाभोलकर केसमध्ये अडकवल्याचा आरोप केला आहे.

कोण आहे खंडेलवाल?
इचलकरंजी येथील रहिवासी असलेला विकास रामअवतार खंडेलवाल (23) हा व्यावसायिक आहे. त्याच्यावर शस्त्रविक्रीचे काही गुन्हे दाखल असून त्याचा साथीदार मनीष नागोरीसह त्याला पोलिसांनी डॉ.दाभोलकर हत्या प्रकरणात अटक केली होती.