आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Dabholkar Murder News In Marathi, Divya Marathi, CBI

दाभोळकरांचे मारेकरी सीबीआयलाही सापडेना, एक वर्ष उलटूनही शोध कार्य सुरुच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज एक वर्ष पूर्ण होतोय. तरीसुद्धा तपास यंत्रणेला त्यांच्या मारेक-यांचा शोध लागला नाही. हत्येचा उलगडा होण्यासाठी पोलिसांनी सर्व साधनसामग्रीचा वापर करत वर्षभर धावधाव केली. मात्र, हत्येचा कोणताच पुरावा न मिळाल्याने अखेर पोलिसांचा तपास थंडावला. त्यामुळे उच्च न्यायालयाने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) तपास हस्तांतरित केला. सीबीआय याप्रकरणी मागील तीन महिन्यांपासून तपास करत आहे. मात्र, अद्यापही त्यांच्या हाती काही ठोस पुरावा उपलब्ध झाला नाही.

डॉ. दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिराजवळील वि. रा. शिंदे पुलावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. पोलिसांनी तातडीने पावले उचलत हल्लेखोरांच्या मुसक्या आवळणे गरजेचे होते. मात्र, तपासाचे गांभीर्य न समजलेल्या यंत्रणेने ठोस कारवाई करण्यास दिरंगाई केल्यामुळे याचा फायदा उठवत हल्लेखोर पसार झाले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपींची रेखाचित्रे तयार केली. त्यानंतर हल्लेखोर एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. हे फुटेज अस्पष्ट असल्याने ते थेट लंडन येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. त्यानंतर हल्लेखोरांच्या दुचाकीशी साधर्म्य असलेल्या काळ्या रंगाच्या शेकडो स्प्लेंडर दुचाकी पोलिसांनी राज्यभरातून तपासून काढल्या.

याप्रकरणी दबाव वाढल्यानंतर पोलिसांनी विधानसभेच्या अधिवेशनापूर्वी ठाणे येथून मनीष नागोरी व विकास खंडेलवाल या दोघांना अटक केली. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली देण्याकरिता एटीएसने आपल्याला 20 लाखांची ऑफर दिल्याची माहिती नागोरीने न्यायालयात देताच राज्यभर खळबळ उडाली. दोघांविरोधात कोणताही पुरावा न मिळाल्याने आणि पोलिसांनी त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल न केल्याने अखेर त्यांना जामीन मंजूर झाला. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आला. आऊटलूक मासिकाच्या माध्यमातून पत्रकार आशिष खेतान यांनी हत्येचा तपास करताना पोलिसांनी प्लॅँचेटचा वापर केल्याचे उघडकीस आणले. यामुळे पोलिस यंत्रणेचे धाबे दणाणले. माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी याप्रकरणी आपली बदनामी केल्याचा आव आणत संबंधितांवर अबु्रनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे जाहीर केले. मात्र, खेतान यांनी दुस-याच दिवशी प्लँचेट प्रकरणाचे फुटेज जाहीर केल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीचे धिंडवडे निघाले होते.

अंनिसचे हितचिंतक वाढले
डॉ. दाभोलकर यांची हत्या अंनिसची चळवळ संपवण्यासाठी केली गेली होती. मात्र, कार्यकर्त्यांनी मागील वर्षभर खंबीरपणे काम केल्याने अंनिसचे हितचिंतक, कार्यकर्ते आणि शाखांमध्ये वाढ झाली असल्याचे मत अंनिसच्या एका कार्यकर्त्याने व्यक्त केले आहे. अशा प्रकारचे भ्याड हल्ले करून एखादी चळवळ संपवणे पुढील काळात अशक्य असल्याने असे प्रयत्न पुन्हा होणार नाहीत. सीबीआयच्या तपासात अद्याप कोणतीही प्रगती नसून ते वस्तुस्थितीची कागदपत्रे हाताळण्यातच अजून गुंतलेले आहेत. गुलाब पोळ यांची प्लॅँचेट प्रकरणी नि:पक्षपातीपणे चौकशी करण्यास शासन टाळाटाळ करत आहे. पुढील वर्षभरात हत्येचे मारेकरी, सूत्रधार मिळावेत याकरिता लोकशाही पद्धतीने तीव्र लढा उभारून जादूटोणा कायदा कठोर अंमलबजावणीसाठी राज्यभर प्रबोधन करण्यात येणार आहे. केंद्रीय पातळीवर अशा प्रकारचा कायदा केला जावा याकरिता पुढाकार घेतला जाणार आहे, अशी प्रतिक्रिया डॉ.दाभोलकर यांचे पुत्र हमीद दाभोलकर यांनी दिली आहे.

अंनिसला तपासाबाबत चिंता
‘आरटीआय’ कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने न्यायालयात नुकताच क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. या पार्श्वभूूमीवर सीबीआय डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास योग्यप्रकारे करू शकेल काय? तसेच तपासातील घडामोडी योग्यप्रकारे न्यायालयापुढे सादर होतील काय, अशा शंका पुरोगामी चळवळीत काम करणा-या कार्यकर्त्यांना पडत आहेत. सीबीआयही मारेक-यांना शोधण्यात अपयशी ठरेल्यास अंनिस कार्यकर्त्यांना पाठबळ कसे मिळणार, अशी चिंता कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

आज आदरांजली कार्यक्रम
डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी न सापडल्याने अंनिस कार्यकर्ते उद्विग्न झाले असून त्यांनी पुण्यात बुधवारी आदरांजली कार्यक्रम आयोजित केला आहे. एक वर्ष पूर्ण होऊनही कुठलाही तपास न लागल्याने कार्यकर्त्यांनी ‘निषेध दिन जागरण’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हत्या झाली त्या पुलावर सकाळी समूहगायन होणार आहे. त्यानंतर निषेध मोर्चा आणि सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अंनिस लोकरंग मंचाच्या वतीने राज्यातील 20 गावांतील 250 कलाकार सलग 6 तास रिंगण नाट्य सादर होईल.
आहेत. मुंबईसह राज्यातील सर्व जिल्ह्यांत आदरांजली कार्यक्रम होणार असून पंजाब, गोवा, बेळगाव, बंगळुरू, केरळ, तेलंगण आदी राज्यांतही आदरांजलीचे कार्यक्रम पार पडणार आहेत.