आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Sadanand More File Form For President Of Punjab Ghuman Marathi Sahitya Sanmelan

'घुमान'मध्ये होणा-या संमेलनाध्यक्षपदासाठी डॉ. सदानंद मोरे रिंगणात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- संत नामदेव यांच्या कर्मभूमीत एप्रिल 2015 मध्ये होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी उडी घेतली आहे. संत नामदेवांच्या कर्मभूमित हे संमेलन होणार असल्याने या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी एखादा संत साहित्याचा अभ्यासक असावा अशी चर्चा सुरु होती. त्यानंतर मोरे यांनी संमेलनाध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांच्या निकटवर्तियांनी सांगितले.
पंजाबमधील घुमान येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक मंडळींनी यापूर्वीच प्रचाराचा नारळ फोडला आहे. संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत, डॉ. श्रीपाल सबनीस, भारत सासणे व मधुसूदन घाणेकर यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यातील काहींनी गेल्या महिन्याभरापासूनच मतदारांच्या गाठीभेटी व त्यांच्याशी पत्रव्यवहार सुरु केला आहे.
साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य म्हणाल्या, अध्यक्षपदासाठी अर्ज करण्याची मुदत 13 ते 23 सप्टेंबर असेल. 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येईल. नऊ ऑक्टोबरपासून मतदारांना मतपत्रिका पाठवल्या जातील. अध्यक्षपदासाठीची मतमोजणी व निकाल 10 डिसेंबरला जाहीर केला जाईल. दरम्यान, या कालावधीत आणखी कोण-कोण इच्छूक अर्ज दाखल करणार व कोण माघार घेणार याबाबत उत्सुकता आहे. तसेच यंदाही निवडणूक होणार की सर्वसंमतीने संमेलनाध्यक्ष निवडला जाणार याचीही उत्सुकता आहे.