पुणे - “सध्याचे पंतप्रधान ‘नो नॉन्सेन्स’ भूमिका ठेवणारे असल्याने देशाला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बलांच्या आरोग्यासाठी ते योग्य पावले उचलतील,” अशी अपेक्षा सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. सायरस पुनावाला यांनी व्यक्त केली.डॉ. पुनावाला यांचा ‘पुण्यभूषण’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. इन्फोसिसचे अध्यक्ष डॉ. नारायण मूर्ती आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते डॉ. पुनावाला यांनी पुरस्कार स्वीकारला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, पुण्यभूषण फाउंडेशनचे डॉ. सतीश देसाई या वेळी उपस्थित होते.
जगातल्या १४३ देशांमध्ये ‘सिरम’च्या लसी दिल्या जातात. या यशाचे कारण सांगताना डॉ. पुनावाला म्हणाले, जगातल्या इतर कोणत्याही औषध कंपन्यांपेक्षा निम्म्या किमतीत ‘सिरम’च्या लसी देण्याचे धोरण मी स्वीकारले. सर्वसामान्य गरिबांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार औषधोपचार उपलब्ध व्हावेत यासाठी हे धोरण होते. याच धोरणाने सिरम जगातली सर्वात मोठी औषध कंपनी बनली.
‘पुण्यभूषण’ पुरस्काराची एक लाखांच्या रकमेत स्वतःच्या दहा लाखांची भर टाकून डॉ. पुनावाला यांनी अकरा लाख रुपयांची रक्कम शरद पवार यांच्याकडे सुपूर्द केली.
समाजातील कष्टकरी, दुर्बल महिलांसाठी ही रक्कम पवारांनी खर्च करावी, अशी सूचना त्यांनी केली. त्यावर पवारांनी तातडीने श्रोत्यांमध्ये बसलेल्या डॉ. बाबा आढाव यांनी व्यासपीठावर निमंत्रित केले. कष्टकरी, मोलमजुरी करणाऱ्या स्त्रियांसाठी काम करणाऱ्या डॉ. आढाव यांच्या संस्थेसाठी ही रक्कम देण्याची विनंती त्यांनी केली. त्यानुसार डॉ. आढाव यांनी अकरा लाख रुपयांचा स्वीकार केला.
सरकारने तीनच गोष्टी कराव्यात
“उद्योजक, व्यावसायिकांपुढचे अडथळे सरकारने काढून टाकावेत, जेणेकरून उद्योजकांना जास्तीत जास्त रोजगारनिर्मिती आणि संपत्ती निर्माण करता यावी. नागरिकांनी दिलेल्या कररूपी निधी देशातील नागरिकांच्या आरोग्य, शिक्षण आणि निवाऱ्यासाठी खर्च करणारे प्रामाणिक व कार्यक्षम राज्यकर्ते आणि अधिकारी देशात हवेत. सरकार कोणाचेही असो, त्यांनी या तीनच गोष्टी केल्या पाहिजेत..” –डॉ. नारायण मूर्ती, उद्योजक