आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Bhalchandra Nemade Says, Marathi Has Had A Long Legacy

जातीच्या ‘भुतां’कडे दुर्लक्ष करून परंपरेशी सांधा जोडा- डॉ.नेमाडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ‘सन १९०१ च्या पूर्वी ‘मराठा’ ही जातच नव्हती. ब्राह्मण राष्ट्रवाद रोखण्यासाठी इंग्रजांनी ‘मराठा’ शब्द हायजॅक केला. माझ्या लहानपणी गावात पाच प्रकारचे कुणबी होते. ते मराठा कधीच लावायचे नाहीत. तुकाराम, शिवाजी स्वतःला कधी ‘मराठा’ म्हणत नव्हते. आजच्या लोकांनी ही भुते उठवली. नव्या पिढीने याकडे दुर्लक्ष केले पाहिजे,’ असे परखड मत ‘ज्ञानपीठ’कार डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी रविवारी व्यक्त केले.
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या शताब्दी सोहळ्यात ‘शंभर वर्षातील मराठी साहित्य आणि समाज’ या विषयावर ते बोलत होते. गेल्या शंभर वर्षांत मराठी समाज जास्तीत जास्त चिंताग्रस्त झाला. सुखी समाजाची लक्षणे मराठी समाजात दिसत नाही. हिंसा आणि न कळणाऱ्या गोष्टी मराठी समजाची चिंता वाढवीत आहेत. अमेरिकी गुप्तचर व्यवस्थेने मनात आणले तर कुठेही दंगे होऊ शकतात, अशी आजची स्थिती आहे, असे निरीक्षण नाेंदवताना नवी पिढी यावरचे उत्तर शोधेल. कारण तिच्या बुद्धिमत्तेवर माझा विश्वास आहे, असा आशावादही डाॅ. नेमाडे यांनी व्यक्त केला.
‘महाराष्ट्राचे दुर्दैव हे की परंपरा कुठून सुरू कराव्यात याचे भान उरलेले नाही. मराठी साहित्य आणि समाजाचा इतिहास साठ हजार वर्षे जुना आहे, पण आपण फक्त शिवाजी किंवा बाराव्या-तेराव्या शतकापर्यंतच मागे जातो. मराठीच्या प्राचीन परंपरेशी सांधा जोडण्याचे काम नव्या पिढीने करावे. परंपरेतील सातत्य आणि बहुविधता टिकवता यायला हवी,’ अशी अपेक्षा डॉ. नेमाडे यांनी व्यक्त केली.

संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अॅड. जयंत शाळिग्राम अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. दिलीप शेठ यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गोरक्ष थोरात यांनी सूत्रसंचालन केले.

डॉ. नेमाडे सांगतात...
>चार वर्षांच्या मुलाला दहा हजार शब्द येतात. त्याचा पाया मातृभाषा असतो. पण मूर्ख पालकांमुळे वाईट दिवस आले आहेत. इंग्रजीमुळेच ‘आबादीआबाद’ होते या अंधश्रद्धेतून मुलांचे बोट धरून खाटीकखान्यात नेल्यासारखे त्याला ते इंग्रजी शाळेत घेऊन जातात. पुढच्या पिढ्यांनी ही चूक करू नये.
>चार वर्षांच्या मुलाला दहा हजार शब्द येतात. त्याचा पाया मातृभाषा असतो. पण मूर्ख पालकांमुळे वाईट दिवस आले आहेत. इंग्रजीमुळेच ‘आबादीआबाद’ होते या अंधश्रद्धेतून मुलांचे बोट धरून खाटीकखान्यात नेल्यासारखे त्याला ते इंग्रजी शाळेत घेऊन जातात. पुढच्या पिढ्यांनी ही चूक करू नये.
>पाश्चात्यांच्या नादाला लागून आपण ‘सेक्युलर’ वगैरेच्या मागे लागलो. बुद्ध, फुले, आगरकरांनासुद्धा या देशातल्या जातीसंस्था मोडता आल्या नाहीत, तरी उथळपणाने जातीचा अंत वगैरे बोलतो आपण. जातीचा अंत म्हणजे या देशाचा अंत हे भान आपल्या लोकांना नाही. धर्मव्यवस्थेपेक्षा जातीव्यवस्था परवडली. हा देश धार्मिक उन्मादामुळे फुटला.
इंग्रजांच्या खानेसुमारीने वाढले जातींमधले अंतर
सामाजिक महाव्यवस्थेचा ‘सेन्स’ मराठी लोकांना नाही. अफगाणिस्तानातील कंदहारपासून ब्रह्मदेश- श्रीलंकेपर्यंत एकच संस्कृती होती. अनेक हिंदू असण्यातील वैविध्याचे वैभव टिकवले पाहिजे. या बहुविधतेचे भान आपण घालवले. इंग्रजांनी याला हातभार लावला. या देशातले मुसलमानसुद्धा स्वतःला कट्टर हिंदू समजायचे. इंग्रजांच्या खानेसुमारीमुळे जातींमधले अंतर वाढले, असे डॉ. नेमाडे म्हणाले.
प्राचीन परंपरेपासून दूर झाल्याने बौद्धिक उंची हरवली
‘टिळक, गोखले, आगरकर, आंबेडकर, फुले यांच्या तोडीचे बुद्धिवंत कुठे आहेत आज महाराष्ट्रात? विठ्ठल रामजी शिंदे, राजारामशास्त्री भागवत, सयाजीराव गायकवाड, पंतप्रतिनिधी, विनोबा भावे हे अप्रतिम बुद्धिमत्तेचे लोक होते. त्यांच्या काळात खूप प्रगती झाली. त्यामानाने आजच्या कविता, कथा, नाटक, निबंधात उत्तुंग बुद्धिमत्ता दिसत नाही. कारण प्राचीन परंपरेशी आपण जोडले गेलेलो नाही,’ असे डाॅ. नेमाडे म्हणाले.