आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Mohan Bhagwat Speech Decades Biggest Rss Gathering Held In Pune

‘शिवशक्ती संगम'; अडीच लाख गर्दीने पुण्यात विराट ‘संघदर्शन'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मारुंजी (जि. पुणे)- अडीच लाखांहून अधिक लोकांची गर्दी जमवून हिंदू संघटनांचे विराट दर्शन घडवण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रयत्न रविवारी पुण्यात अपेक्षेहून अधिक यशस्वी झाला. नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांतील पाच हजार ८७७ गावांमधले संघ स्वयंसेवक आणि श्रोत्यांनी ‘शिवशक्ती संगम' मेळाव्याला उपस्थिती लावली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात विराट मेळावा ठरल्याचे अनुभवी स्वयंसेवकांनी सांगितले. ज्येष्ठ स्वयंसेवक मोरेश्वर जोशी यांनी सांगितले की, यापूर्वी सन १९८३ मध्ये पुण्यात तळजाई टेकडीवर संघ मेळाव्यास ३५ हजारांची उपस्थिती होती. दोन वर्षांपूर्वीच्या केरळातील मेळाव्यास लाखभर स्वयंसेवक आले होते. या पार्श्वभूमीवर आजचा मेळावा दीर्घकाळ लक्षात राहणारा विराट ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते वय वर्षे १०२ असलेले पुण्यातील लक्ष्मण दिनकर यांच्यापर्यंत आणि महात्मा फुले यांचे खापरपणतू चंद्रशेखर, नितीन-दत्ता फुले यांच्यापासून ते नव्वदी ओलांडलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यापर्यंत विविध क्षेत्रंातील लोकांनी गर्दी केली होती. तब्बल १०८ एकरांच्या मैदानावर आखून दिलेल्या जागेवर विशाल जनसमुदाय शिस्तीने बसला होता. दुपारपासूनच परगावाहून येणाऱ्या वाहनांच्या रांगा हिंजवडी परिसरात लागल्या होत्या. दाेनशे एकर क्षेत्रावर वाहनांच्या ‘पार्किंग'ची व्यवस्था करावी लागली. प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी उभारलेल्या दाेनशे फूट लांब आणि ८० फूट उंचीच्या व्यासपीठावर तोरणा किल्ल्याचे चित्र झळकत होते. त्यापुढे रायगडावरील मेघडंबरीची प्रतिकृती आणि त्यात शिवाजीराजांचे छायाचित्र होते. याशिवाय संघाचे संस्थापक डॉ. बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक माधव गोळवलकर यांचीही छायाचित्रे व्यासपीठाच्या दोन्ही बाजूस होती.
दुपारी बरोबर साडेचार वाजता सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उघड्या वाहनातून मेळाव्याच्या ठिकाणी आले. संघपरंपरेनुसार त्यांनी संपूर्ण मैदानात घोषवादन करणाऱ्या स्वयंसेवकांचे निरीक्षण केले. त्यानंतर सुमारे सातमजली उंचीच्या ध्वजस्तभावर भगव्या ध्वज फडकवण्यात आला. संघ प्रार्थनेनंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉ. मोहन भागवत, सहकार्यवाह भय्याजी जोशी, प्रांतसंघचालक नाना जाधव, प्रांत कार्यवाह विनायक थोरात आणि क्षेत्रीय संघचालक जयंती भाडेसिया या संघाच्या पाच पदाधिकाऱ्यांनाच व्यासपीठावर स्थान होते.
क्षणचित्रे
"नव्या युगाची दे ललकारी
शिवशक्तीचा अपूर्व संगम
जगास कळते केवळ एकच
सामर्थ्याची भाषा कणखर’ - हे समूहगान प्रारंभी गायले गेले.
{चीन, युरोप, अमेरिका, आखाती देशातील आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी या कार्यक्रमाच्या वार्तांकनाची अनुमती मागितली होती. संघाच्या इतिहासात प्रथमच अशी परवानगी देण्यात आली.
{एक लाख ६० हजार संघ स्वयंसेवक गणवेशात उपस्थित होते. उद्योजक, कलाकार, राजकीय नेते, साहित्यिक आदी दहा हजारांना निमंत्रितांमध्ये स्थान देण्यात आले होते.
{अडीच लाखांपेक्षा अधिक लोक आणि हजारो वाहनांची गर्दी असूनही मेळाव्याला कसलेही गालबोट लागले नाही. दहा हजार स्वयंसेवक गर्दी आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करत होते.
हायटेक तंत्रज्ञानाचा वापर
{दुपारी तीन वाजता संचलनाने सुरू झालेला शिवशक्ती संगम मेळावा सायंकाळी साडेसहाला भगव्या ध्वजवंदनाने संपला. डॉ. भागवत यांच्याखेरीज कोणाचेही भाषण झाले नाही.
{हा कार्यक्रम अतिशय भव्यदिव्य अशा स्वरुपाचा होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी शुध्द पिण्याच्या पाण्याचे १५ हजार जार पुरवण्यात आले होते. कार्यक्रमाचे व्यासपीठ हे २०० फूट लांब, १०० फुट रुंद आणि ८० फुट उंचीचे होते
{अतिशय शिस्तबद्ध झालेल्या या कार्यक्रमाची ‘लिम्का बुक अाॅफ वर्ल्ड’मध्ये नाेंद व्हावी यासाठी प्रयत्न केले जात अाहेत.
{कार्यक्रमस्थळी स्वयंसेवकांच्या नोंदणीसाठी बारकोड पद्धतीचा वापर करण्यात आला. संघकार्याची माहिती देणारी ‘डिजिटल प्रदर्शनी’ लावण्यात आली होती.

गणवेशातले मंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे, विष्णू सावरा यांनी नेहमीच्या वेशात श्रोत्यांमध्ये उपस्थिती लावली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राज्यातले मंत्री गिरीश बापट, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, दिलीप कांबळे, राम शिंदे हे सर्वजण संघाच्या गणवेशात हजर होते. नगर, नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे आमदार, खासदार, नगरसेवकही संघाच्या गणवेशात आले होते.