आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'भारत माता की जय' म्हटले पाहिजेच पण सक्तीही नको- डॉ.श्रीपाल सबनीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारा एकत्र आणण्याची हीच खरी वेळ आहे. दोन्ही विचारधारेच्या अनुयायांनी केवळ वैचारिक संघर्षामध्ये वेळ वाया न घालवता समन्वयाची भूमिका घ्यावी, कारण सध्या देशातील परिस्थिती अराजकसदृश्‍य आहे. प्रत्येकानेच "भारत माता की जय' ही घोषणा द्यायला हवी पण तशी घोषणा द्याच अशी सक्ती केली जाऊ नये, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवडच्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आज पुण्यात केले.
पुणे शहर जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त दुर्मीळ छायाचित्रे, पत्रव्यवहार आदी दस्तावेजांचा समावेश असलेल्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन डॉ सबनीस यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी उपमहापौर आबा बागूल, माजी आमदार मोहन जोशी, रंजित सांगावकर, गुलाबराव ओव्हाळ आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी आणि श्री.छत्रपती शाहू महाराज स्वयंरोजगार सेवा संस्था कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. आंबेडकरांच्या 125 व्या जयंतीचे औचित्य साधून कै. वसंतराव बागुल उद्यानातील पं.भीमसेन जोशी कलादालनामध्ये या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री आठपर्यंत हे प्रदर्शन सर्वसामान्यांसाठी खुले असेल.
यावेळी सबनीस म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसला कितीही विरोध केला असला तरी या पक्षातील चांगले गुण त्यांना नेमकेपणाने माहिती होते. काँग्रेसनेही देशात अनेक कायदेतज्ज्ञ असताना डॉ. आंबेडकरांची राज्यघटना लिहिण्यासाठी निवड केली हे पक्ष म्हणून काँग्रेसचे मोठेपण आहे. भारतीय राज्य घटनेने देशातील प्रत्येक नागरिकांना बोलण्याचे, खाण्याचे, देशात कोठेही जाण्याचे आणि वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. मात्र सध्या देशात धार्मिक उन्माद सुरू असून देशातीलच नागरिकांवर अनेक प्रकारची बंधने घालण्याची भाषा केली जात आहेत. देशातील नागरिकांवर खाण्याचे, बोलण्याचे बंधन घालणे हा भारतीय राज्यघटनेचा आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान आहे, असेही डॉ सबनीस म्हणाले.
आबा बागूल यांनी डॉ. आंबेडकरांच्या कार्य आणि कर्तृत्वाचा आढावा घेतला. ते म्हणाले, डॉ. आंबेडकरांमुळे देश आज एकसंध आहे, त्यांनी केलेले काम खरंच खूप मोठं असून आजही त्यांची तत्त्वे तंतोतंत लागू पडतात. देशातील दलित उपेक्षितांना न्याय मिळवून देण्याबरोबरच डॉ. आंबेडकरांनी या देशाचे घटनात्मक नियोजनही आखले असे त्यांनी सांगितले.
भारत माता की जय म्हणायलाच हवे, पण सक्ती नको- सबनीस
सध्या देशात "भारत माता की जय' या घोषणेवरून सुरू असलेले राजकारण दुर्दैवी आहे. प्रत्येकानेच भारत मातेचा जयजयकार करायला हवा, पण त्याची लोकांना सक्ती केली जाऊ नये, असे सांगत सबनीस यांनी देशातील असहिष्णुतेवरही जोरदार टीकास्त्र डागले.