आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पी. व्ही. नरसिंह राव ‘सह्याजीराव’ नव्हतेच; डॉ. संजय बारू यांचे मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- “देशाच्या राजकारणावर आणि प्रगतीवर दूरगामी परिणाम करणारे अनेक निर्णय पी. व्ही. नरसिंह राव यांनी पंतप्रधान म्हणून घेतले. त्यातला एकही निर्णय नंतरच्या काळात मागे घेतला गेला नाही. असे असूनही काँग्रेस पक्ष आणि देशातील जनता या माजी पंतप्रधानाला विसरली आहे. पी. व्ही. नरसिंह राव हे केवळ सह्या करणारे नव्हते, तर धोरणात्मक निर्णय घेणारे पंतप्रधान होते,” असे मत राजकीय समालोचक डॉ. संजय बारू यांनी व्यक्त केले.

डॉ. बारू यांनी लिहिलेल्या ‘१९९१ - हाऊ पी. व्ही. नरसिंह राव मेड हिस्ट्री’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. पुणे इंटरनॅशनल सेंटरचे विश्वस्त डॉ. दिलीप पाडगावकर यांनी बारूंची मुलाखत घेतली.

डॉ. बारू म्हणाले, ‘आजवरच्या प्रत्येक पंतप्रधानांचे बरे-वाईट अनुभव आहेत. नरसिंह राव यांच्या बाबतीत हेच झाले. सन १९९१ ते ९५ या त्यांच्या कारकीर्दीतील राव यांचे आर्थिक धोरण, राजकीय वाटचाल, दूरदृष्टी देशाने लक्षात ठेवली नाही. सन १९९१ साल भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरले. अटलबिहारी वाजपेयी यांनी सुरुवातीच्या काळात पी. व्ही. नरसिंह राव यांच्याकडून अनेक गोष्टी शिकल्या; पण आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्याकडून काहीच शिकले नाहीत, असे म्हणावे लागेल. मोदींच्या ‘अच्छे दिन’च्या घोषणा हवेत विरल्या असून त्यांनी पंतप्रधान म्हणून कोणतीच भरीव कामगिरी केलेली नाही.’

काँग्रेसचा चेहरा ममता?
‘काँग्रेस लाजर भविष्यात भारतीय जनता पक्षाच्या विरोधात उभे राहायचे असेल तर ममता बॅनर्जी (पूर्वाश्रमीच्या काँग्रेसवासी) यांच्याशिवाय त्यांच्याकडे चेहरा नाही. देशाचे नेतृत्व करण्यासाठी खालच्या स्तरापासून सामान्य नागरिकांचा पाठिंबा असणे आवश्यक असते. असा पाठिंबा असलेला कोणताही नेता सध्या तरी काँग्रेसकडे नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्याशिवाय काँग्रेसकडे पर्याय नाही आणि पक्षाला नेतृत्वही नाही’, असेही डॉ. बारू म्हणाले.

सुहृदयी पी. व्ही.
‘नरसिंहराव यांनी नेहमी योग्य माणसे सोबत ठेवली. त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि स्वभाव जटिल असला तरी ते सुहृदयी होते. त्यांना शास्त्रीय संगीत, पुस्तकांचा व्यासंग हाेता. पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्यानंतर हा माणूस केवळ कपड्यांची बॅग आणि पुस्तकांसोबत शासकीय निवासस्थानाबाहेर पडला. इतर राजकारण्यांसारखे त्यांनी दुबई, सिंगापुरात घरे घेतली नाहीत. आजही त्यांचे कुटुंबीय मध्यमवर्गीय आयुष्य जगतात’, असे डॉ. बारू म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...