आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात एकाच दिवशी तब्बल २० कोटी पुस्तकांचे वाचन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृतीनिमित्त १५ ऑक्टोबर हा दिवस राज्यात ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून साजरा करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर यंदा १५ ऑक्टोबरला राज्यात एकाच दिवशी तब्बल २० कोटी पुस्तकांचे वाचन होणार असल्याचे संकेत राज्याचे शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांनी दिले आहेत. या उपक्रमाची नोंद आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.
यासंदर्भातील शासकीय परिपत्रकानुसार इयत्ता बारावीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्याकडून किमान १० छोटी पुस्तके (प्रत्येकी किमान १६ पृष्ठे) वाचली जावीत, अशा पद्धतीने नियोजन केले जात आहे. यासाठी राज्यातील प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार आणि वयानुरूप वाचनोपयोगी पुस्तकांची उपलब्धता करण्याबाबतचे नियोजन सुरू करण्यात आले आहे, असेही धीरजकुमार म्हणाले.
या नियोजनाचा एक भाग म्हणून राज्यातील सर्व विभागीय अधिकाऱ्यांकडे प्रत्येकी पाच शाळांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विद्या प्राधिकरणाकडून द्विभाषिक पुस्तकांची यादी प्रसिद्ध होणार असून त्यातील पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावीत, असे शाळांना कळवण्यात आले आहे. यातून प्रत्येक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत १० पुस्तके उपलब्ध केली जाणार आहेत. या दिवशी पुस्तक दिंडीचेही आयोजन प्रत्येक शाळेत केले जाणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गाेडी लावावी या उद्देशाने शिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील शाळांमधून हा उपक्रम हाती घेतला जात अाहे. प्रत्येक शाळांवर व शिक्षकांवर त्याची जबाबदारी साेपवण्यात अाली असल्याचे अायुक्तांनी सांगितले.
गोंदिया मॉडेल
वाचन प्रेरणा दिवसाची पूर्वतयारी म्हणून गोंदिया जिल्ह्याने ८ सप्टेंबर २०१६ हा दिवस ‘वाचन आनंद दिवस’ म्हणून साजरा केला. जिल्ह्यातील सर्व २६ लाख मुलांनी सरासरी १० पुस्तके वाचणे अभिप्रेत होते. मात्र उत्साही विद्यार्थ्यांनी तब्बल ३१ लाख पुस्तके वाचल्याची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील शाळांनी गोंदिया मॉडेलचे अनुकरण करावे, असेही परिपत्रकात नमूद केले आहे.
दप्तरमुक्त दिवस
वाचन प्रेरणा दिवसाविषयी तीन ते पाच दिवस आधी प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती देण्यात येणार आहे. हा दिवस दप्तरमुक्त दिवस असावा. शक्य असेल तिथे संगणक, टॅबद्वारे ऑनलाइन पद्धतीने अधिकृत पुस्तके अॅप्सद्वारे उपलब्ध केली जावीत. प्रोजेक्टरद्वारेही पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावीत. पुस्तके कमी पडण्याची शक्यता जाणवल्यास सार्वजनिक ग्रंथालयांकडून प्रती घेण्याचे नियाेजन अाहे.
बातम्या आणखी आहेत...