आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘सत्याग्रही’ सप्तर्षींना हिंदुत्ववाद्यांचे हार-तुरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - अच्युतराव पटवर्धन, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे यांच्या सावलीत वाढलेल्या आणि आयुष्यभर निष्ठेने समाजवादी विचारांची कास धरलेल्या डॉ. कुमार सप्तर्षी यांची पंचाहत्तरी २१ ऑगस्टला पुण्यात साजरी होत आहे. मात्र ‘नथुराम गोडसेचे वारसदार’, ‘फॅसिस्ट मनोवृत्ती’, ‘जातीयवादी’ अशा शेलक्या विशेषणांनी सप्तर्षींनी ज्यांचा आयुष्यभर प्रतिवाद केला त्याच शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांकडून अमृतमहाेत्सवी सत्कार स्वीकारण्याची वेळ त्यांच्यावर अाली अाहे.

डॉ. सप्तर्षींच्या अमृतमहोत्सवासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आवर्जून वेळ दिला आहे. याच सप्तर्षींचे ‘अरे-तुरे’तले मित्र असणारे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी मात्र त्यांच्या या कार्यक्रमासाठी तारीख जुळवलेली नाही. सप्तर्षींचे जुने मित्र ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे हेदेखील यादरम्यान परदेशात असल्याने येणार नाहीत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह भाजपचे नेते, पालकमंत्री गिरीश बापट, भाजपच्या मित्रपक्षातील मंत्री सदाभाऊ खोत, महादेव जानकर, बच्चू कडू आदी मंडळीही येणार आहेत.

हिंदुत्ववाद्यांबरोबरचा सततचा संघर्ष हे सप्तर्षींच्या राजकीय-सामाजिक आयुष्याचे वैशिष्ट्य. त्यांच्या पुण्यातल्या घरावर हिंदुत्ववाद्यांनी हल्लादेखील चढवला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर त्यांचे वैचारिक मतभेद होते. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि भाजप नेत्यांकडून होणारा सत्कार त्यांना कसा चालतो, याची चर्चा सुरू झाली आहे. सर्वपक्षीय सत्काराच्या नावाखाली सप्तर्षी जातीयवाद्यांकडून आरत्या ओवाळून घेणार का, अशी कुजबूज आता सुरू झाली आहे.

‘मी महान नाही. साधा माणूस आहे. कार्यकर्त्यांनी जेव्हा अमृतमहाेत्सवी सत्काराचा विषय काढला तेव्हा ‘मी बिल्कूल तयार नाही’ असे म्हणत काही जणांसारखे नखरे मी केले नाहीत. उलट ही एक संधी असते. यानिमित्ताने समाज जे काही खरे-खोटे गुण लावेल त्यातून उर्वरित आयुष्यात सुधारण्याची संधी मिळेल. मला समाजाशी संवाद साधण्याची संधी मिळेल म्हणून मी तयार झालो, असे डॉ. सप्तर्षी यांनी सांगितले.

मत्सरी समाजवादी
‘माझ्या सत्कारात ‘समाजवादी’ नसल्याची शंका ज्यांना वाटते त्यांना खरे तर त्यांच्या पंचाहत्तरीचे सत्कार का होत नाहीत, हा प्रश्न पडला आहे. त्यांनीही माझा सत्कार करावा की! मी कुठे नाही म्हणतोय? मत्सर हा काहींचा स्थायिभाव आहे म्हणून तर समाजवादी चळवळ वाढली नाही. उद्धव ठाकरेंनी माझा सत्कार केला म्हणून त्यांनी लगेच सत्याग्रही विचारधारा स्वीकारली असे होत नाही किंवा मीही शिवसैनिक झालो असे होत नाही. - डॉ. कुमार सप्तर्षी.

‘काका’ म्हणून येणार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
स्वतः सप्तर्षी यांनी शब्द टाकल्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी येण्याचे कबूल केल्याचे सांगितले जाते. सप्तर्षी यांनी ही शंका साफ फेटाळली. ‘कार्यकर्त्यांनी सर्वांना पत्रे पाठवली. उद्धव ठाकरे यांनाही पत्र गेले होते. ‘काका’च्या सत्काराला ते येणार आहेत. सत्याग्रही माणूस दुसऱ्याची मुंडकी उडवत नाही. शत्रूलाही मित्र करतो. मी आयुष्यात कोणाशीही नाते तोडले नाही. नितीशकुमारही खरे तर येणार होते. त्यांनी कार्यकर्त्यांना पाटण्याला बोलावलेही. पण ऐनवेळी त्यांचे येणे रद्द झाले. शरद पवारांनाही पत्र गेले होते. त्यांनी शुभेच्छापत्र पाठवले अाहे,’ असे सप्तर्षी म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...