आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगभूत नाट्य हे साहित्य अन‌् रंगभूमीचे सामर्थ्य!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - अखिल भारतीय पातळीवरच्या, पण दोन वेगळ्या पद्धतींची परंपरा जोपासणा-या ‘संमेलन उत्सवमूर्ती’ गुरुवारी प्रथमच एका व्यासपीठावर आल्या आणि ‘अंगभूत नाट्य हेच साहित्य आणि रंगभूमीचे सामर्थ्य असते’, या मुद्द्यावर त्यांच्यात एकमतही झाले. हा दुर्मिळ योग ‘संवाद’ आयोजित गप्पांच्या कार्यक्रमात जुळून आला आणि पुणेकरांना एकाच वेळी शब्दसुरांच्या मैफलीचा रंगतदार प्रत्यय आला.

घुमानच्या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे आणि बेळगावच्या नाट्यसंमेलनाच्या नियोजित अध्यक्षा फय्याज गुरुवारी हे दोघे एकाच व्यासपीठावर आले. डॉ. मोरे यांनी एरवीची ‘विचारवंत’ भूमिका सोडून सादर केलेल्या कविता, नाटकांचे अनुभव आणि फय्याज यांच्या संगीत नाटकांच्या, तालमींच्या, प्रयोगांच्या आठवणींना मिळालेला त्यांच्या सुरांचा साज, यातून हे गप्पांगण उत्तरोत्तर रंगत गेले.

फय्याज यांनी डॉ. सदानंद मोरे यांना नाट्यसंमेलनाला अवश्य या, असे निमंत्रण दिले. त्यानंतर डॉ. मोरे यांनीही फय्याज यांना घुमानला निमंत्रण दिले. संमेलने वेगळी असली तरी त्यांच्यातला ‘नाट्यनुभवा’चा धागा समान आहे, असा उल्लेख मग डॉ. मोरे यांनी केला.

‘संवाद’ वाढवणारे वाद हवेत !
संमेलनात वाद जरूर असावेत, पण त्यातून संवाद वाढावा. ‘करू आवडीने वाद, पुढच्या सुखाचा संवाद’ असे वाद असावेत, अशी अपेक्षा डॉ. मोरे यांनी मांडली. घुमानला मराठी माणसे नसली, तरी घुमानमध्ये, पंजाबमध्ये आज जे काही आहे, त्याला मराठी माणसांचे कर्तृत्व जबाबदार आहे, याची जाणीवही डॉ. मोरे यांनी करून दिली.

लोकमान्य अन् महात्मा
मी ‘लोकमान्य ते महात्मा’ हा ग्रंथ लिहिला. तेव्हा माझ्यासमोर घराण्यांचा संघर्ष हेच रूपक होते, असे सांगून डॉ. मोरे म्हणाले, ‘लोकमान्यांच्या निधनानंतर महात्माजींचे नेतृत्व, हे पंडितजींच्या गायकीनंतर खाँसाहेबांची गायकी मुरवण्यासारखेच अवघड होते, हा विचार मनात ठेवून मी तत्कालीन कार्यकर्ते व नेत्यांचा मानसिक संघर्ष ग्रंथात मांडला. मी लिहिलेल्या ‘बालगंधर्व आणि गोहरजान’ या नाटकाला त्यामुळेच अद्याप कुणी निर्माता भेटला नसावा.’