पुणे - दोन मद्यधुंद जवानांनी गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास कॉलेज ऑफ मिलिट्री इंजिनिअरिंगच्या (सीएमई) गेटजवळ दुचाकी आणि तीनचाकी गाड्यांची तोडफोड केली. त्यांना अटकाव करणा-या दोन पोलिस कर्मचारी व नागरिकांना या जवानांनी मारहाण केली. या प्रकरणी जवानांविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवलसिंग दिलवीरसिंग (३४) व जिगरसिंग केसरसिंग (३४) असे गुन्हा दाखल झालेल्या जवानांचे नाव आहे. हे दोघे वाहनांची तोडफोड करत असताना परिसरातील नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले. तेथे आलेले पोलिस कर्मचारी प्रफुल्ल शेलार आणि बापू बरडे यांनाही जवानांनी मारहाण केली. लष्करानेही दोन्ही जवानांवर गुन्हा दाखल करून त्यांचे कोर्टमार्शल करणार असल्याचे सांगितले आहे.