आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाटांच्या धरणांमुळे भीमा खाेरे दुष्काळी, जल अभ्यासक प्रफुल्ल कदम यांचा अाराेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुळशी धरणाचा फाइल फाेटाे - Divya Marathi
मुळशी धरणाचा फाइल फाेटाे
पुणे - भीमा नदीच्या खोऱ्यातील टाटा पॉवर कंपनीच्या सहा धरणांंमुळेच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये दुष्काळी स्थिती आहे. ‘टाटां’च्या या धरणांमधील ४८.९७ टीएमसी पाणी ताब्यात घेऊन राज्यातल्या दाेन कोटी लोकांची तहान भागवली जावी, अशी मागणी जलअभ्यासक प्रफुल्ल कदम यांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत शासनाने निर्णय न घेतल्यास जलसत्याग्रह करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात ‘टाटां’नी पुणे जिल्ह्यात लोणावळा, वळवण, शिरवटा, ठाकरवाडी, सोमवडी आणि मुळशी येथे सहा धरणे बांधली. या धरणांवर ४४५.५ मेगावॅट क्षमतेचे जलविद्युत निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले आहेत. टाटांनी यासाठी भीमेच्या तुटीच्या खोऱ्यातील प्रचंड पाणी वापरले आहे. खासगी जलविद्युत प्रकल्पांसाठी वापरले जाणारे हे पाणी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दुष्काळी भागासाठी जीवदान ठरू शकते. टाटांच्या योगदानाबद्दल पूर्ण आदर असला तरी स्वातंत्र्यपूर्व काळातील त्यांच्या खासगी मालकीच्या धरणांमुळे भीमा नदीचे खोरे दुष्काळग्रस्त झाले आहे, असा आरोप कदम यांनी केला. ‘पिण्याच्या पाण्याची अवस्था भीषण असताना खासगी विद्युत निर्मिती प्रकल्पांना पाणी देणे गरजेचे आहे का, याचा विचार झाला पाहिजे. ‘टाटां’च्या धरणातून तयार होणारी सुमारे ४५० मेगावॅट वीज नॅशनल ग्रीडमधून राज्याला घेता येणे शक्य आहे. त्यामुळे दोन कोटी लोकांना पाणी खुले करता येईल. टाटांच्या सहा धरणांमधले पाणी दुष्काळी भागाला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कृती समिती तत्काळ स्थापन करून तातडीने निर्णय घ्यावा,’ अशी मागणीही कदम यांनी
निवेदनात केली अाहे.

टाटांच्या धरणांमधल्या ५०० मेगावँट वीजनिर्मितीसाठी जास्तीत जास्त ३ हजार कोटी रुपये खर्च येतो. एका वर्षात खर्च होणाऱ्या दुष्काळ निवारण निधीच्या तुलनेत हा खर्च नगण्य अाहे. गेल्या पाच वर्षात राज्याने दुष्काळावर १४ हजार ९९२ कोटी रुपये खर्च केले आहेत. यापुढे टाटांची वीजनिर्मिती किरकोळ ठरते. शिवाय टाटांची धरणे सोलापूर, बीड, परभणीसारख्या जिल्ह्यांपासून अधिक उंचीवर असल्याने सुमारे ४९ टीएमसी पाणी दुष्काळी भागात खेळवणे तुलनेने सोपे आहे, याकडेही कदम यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

पुढे वाचा... हे आहेत आक्षेप