आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दुनियादारी’ दुर्मिळच; वाचकांची वेटिंग लिस्ट!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - कॉलेज कॅम्पसचे भन्नाट चित्रण करणारी सुहास शिरवळकरांची ‘दुनियादारी’ ही कादंबरी मिळणे सध्या दुरापास्त झाली आहे. गेले काही महिने या लोकप्रिय कादंबरीच्या नव्या आवृत्तीची वाचकांना प्रतीक्षा आहे. उपलब्ध सर्व प्रती संपल्या असून वाचकांनी आता नव्या प्रतींसाठी रांगा लावल्या आहेत. त्यामुळे ‘दुनियादारी’साठी वेटिंग लिस्ट तयार झाल्या आहेत.


‘दुनियादारी’ ही कादंबरी प्रथम 1982 मध्ये प्रकाशित झाली होती आणि तेव्हापासून ती वाचकप्रिय आहे. मात्र, या कादंबरीवर आधारित त्याच नावाचा मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून या कादंबरीला अचानक मागणी वाढली आहे.


गेल्या दोन आठवड्यांमध्ये या कादंबरीच्या उपलब्ध सर्व प्रती संपल्याची माहिती प्रमुख विक्रेत्यांनी दिली. मात्र, प्रती संपल्यावरही नव्या आवृत्तीची विचारणा केली जात आहे, असे पुण्यातील अक्षरधारा बुक गॅलरीचे लक्ष्मण राठीवडेकर म्हणाले. आमच्याकडे सुमारे शंभर वाचकांनी ‘दुनियादारी’साठी वेटिंग लिस्टमध्ये नाव दिले आहे, असे त्यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.


कादंबरीचे प्रकाशक, शशिदीप प्रकाशनाचे शशिकांत खोपकर म्हणाले, ‘दुनियादारी’ची नवी आवृत्ती ऑगस्टच्या दहा तारखेपर्यंत उपलब्ध होईल. शिरवळकरांची दुनियादारी आम्ही 1985 पासून प्रकाशित करत आहोत. आता या कादंबरीची दहावी आवृत्ती वाचकांसमोर येईल.


उत्सुकता वाढली
पूर्वी दिवसाला एक प्रत विकली जात असे. सध्या रोज दहा ते पंधरा प्रती विकल्या जात आहेत. आमच्याकडे ‘दुनियादारी’च्या नव्या प्रतीसाठी आगाऊ नोंदणी करणारे सुमारे शंभर वाचक आहेत. अन्य विक्रेत्यांकडेही अशी वेटिंग लिस्ट आहे. या कादंबरीवर चित्रपट आल्याने मूळ कादंबरी वाचण्याची उत्सुकता नव्याने निर्माण झाली आहे.’’
लक्ष्मण राठीवडेकर, अक्षरधारा बुक गॅलरी, पुणे.