आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राचा भूगर्भ शांतच; काश्मीर, आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, गुजरातमध्येही धक्के

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - तब्बल७.९ रिश्टर स्केल इतक्या जोरकस भूकंपाने नेपाळ हादरल्याच्या घटनेला तीन दिवस उलटले. मात्र, नेपाळच्या देवभूमीची थरथर अद्याप थांबलेली नाही. गेल्या तीन दिवसांत या शेजारी देशात ६६ वेळा धरणीकंप झाला. या भूकंपांची तीव्रता कमीत कमी ३.२ ते जास्तीत जास्त ६.६ रिश्टर स्केलइतकी असल्याची नाेंद भारतीय हवामान विभागाकडे (आयएमडी) झाली अाहे.
नेपाळनजीकच्या प्रदेशातील भूभर्गातील हालचाली अद्याप थंडावलेल्या नसल्या तरी सुदैवाने महाराष्ट्रात एकाही भूकंपाची नोंद झालेली नाही. जगातील सर्वात कमी वयाच्या हिमालय पर्वताच्या पायथ्याचा नेपाळ स्थिरावलेला नाही. भूपृष्ठापासून जमिनीच्या पोटात १० ते २० किलोमीटर खोलीवर केंद्रबिंदू असलेले हलक्या ते मध्यम तीव्रतेचे धक्के येथे रोज बसताहेत. २५ एप्रिलचा सर्वात मोठा भूकंप होईपर्यंत गेल्या महिनाभरात मात्र नेपाळमध्ये एकाही भूकंपाची नोंद झालेली नव्हती, हे विशेष.

शेजारी राष्ट्र नेपाळसोबतच नजीकच्या जम्मू-काश्मीर, आसाम, बिहार, उत्तर प्रदेशसह ईशान्य भारतातील सर्व राज्ये, चीनचा सीमावर्ती भाग, बांगलादेश, अंदमान समुद्र, इंडोनेशिया, म्यानमार, पाकिस्तान, अफगाणिस्तानातील हिंदुकुश पर्वत या ठिकाणीही हलक्या स्वरूपाच्या भूकंपांची नोंद गेल्या तीन दिवसांत झालेली आहे. अगदी शेजारच्या गुजरातमधील मेहसाणा प्रांतातही हलके हादरे जाणवले. याच काळात महाराष्ट्राच्या भूगर्भात शांतता आहे. ‘७.९ रिश्टर स्केलच्या मोठ्या धक्क्यानंतर भूगर्भातील स्थिती पूर्ववत व्हायला वेळ लागतो. तोवर लहान ते मध्यम स्वरूपाचे धक्के (आफ्टरशॉक्स) बसणे अनैसर्गिक नाही,’ अशी माहिती पुणे वेधशाळेतील तज्ज्ञांनी दिली.

इतर राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्र निर्धोक
अतितीव्रभूकंपाची (झोन पाच) शक्यता असलेला भूप्रदेश अापल्या देशात सुमारे १२ टक्के आहे. संपूर्ण ईशान्य भारत, बिहार-आसामचा काही भाग आणि कच्छ हा भाग या १२ टक्क्यांमध्ये येतो. तीव्र भूकंपाची शक्यता असलेला प्रदेश ‘झोन चार’मध्ये मोडतो. हा प्रदेश देशात १८ टक्के आहे. यात महाराष्ट्रातला कराड, सातारा, नजीकच्या सह्याद्री परिसरातील थोडा भाग येतो. दक्षिण कोकण, खान्देश आणि मध्य महाराष्ट्राचा काही भाग ‘झोन तीन’ म्हणजेच साधारण भूकंपाची शक्यता असलेल्या भागात येतो. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाचा बहुतांश भाग ‘झोन दोन’ म्हणजेच हलक्या भूकंपाची शक्यता असलेल्या भागात येतो. थोडक्यात, नेपाळप्रमाणे सात किंवा त्यापेक्षा अधिक रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप होण्याची शक्यता असलेला भाग महाराष्ट्रात अाढळून येत नाही.

भारतीय हवामान विभागाच्या भूकंप विज्ञान शाखेतर्फे भूकंपाचा अभ्यास केला जातो. भूगर्भशास्त्र आणि उपलब्ध भूकंपांच्या नोंदीनुसार या शाखेने पाच भागांत भारताची विभागणी केली अाहे.

झोन पाच : अतितीव्रभूकंपाची शक्यता (लाल रंग)
झोनचार : तीव्रभूकंपाची शक्यता (हिरवा रंग)
झोनतीन : साधारणभूकंपाची शक्यता (पिवळा रंग)
झोनदोन : हलक्याभूकंपाची शक्यता (निळा रंग)