आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रिपद गमावलेल्या ‘नाथाभाऊं’चा मान शाबूत; व्यासपीठावर पहिल्या रांगेत स्थान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरही भारतीय जनता पक्षामधला एकनाथ खडसे यांचा मान पूर्वीसारखाच शाबूत असल्याचे शनिवारी पाहण्यास मिळाले. निमित्त होते भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीचे. भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून खडसे यांना सन्मानाची वागणूक मिळाली तरी त्यांचा ‘आवाज’ दिवसभरात ऐकायला मिळाला नाही.

खडसेंच्या राजीनाम्यानंतर भाजपचा पहिलाच मोठा कार्यक्रम असल्याने सर्वांचे लक्ष खडसे यांच्याकडे होते. सत्तेतून पायउतार व्हावे लागल्याची सल खडसे यांनी यावेळी चेहऱ्यावर उमटू दिली नाही. भाजप कार्यकर्त्यांचे ‘नाथाभाऊ’ असलेले खडसे सकाळीच बैठकीच्या स्थळी उपस्थित झाले. त्या वेळी कार्यकर्त्यांचा त्यांना गराडा पडला. उद्घाटन सत्रापूर्वी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची स्वतंत्र बैठक खासगी हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. भाजपचे राष्ट्रीय नेते वेंकय्या नायडू, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी प्रमुखांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीस खडसे उपस्थित होते. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास मुख्य कार्यक्रमासाठी खडसे उपस्थित झाले.

या वेळी व्यासपीठावरच्या पहिल्या रांगेत खडसे यांना स्थान देण्यात आले होते. प्रदेशाध्यक्षांच्या शेजारची खुर्ची खडसे यांना देण्यात आली होती. भाजपच्या पुण्याच्या अध्यक्षांनी इतर सर्व पाहुण्यांप्रमाणेच खडसेंचाही पुणेरी पगडी, शाल फळांची टोपली देऊन सत्कार केला. उद्घाटन सत्रात दानवे, फडणवीस नायडूंचीच भाषणे झाली. त्यांनी ‘नाथाभाऊं’चा आवर्जून उल्लेख केला. फडणवीसांनी तर ‘नाथाभाऊं’वरील आरोप निराधार असल्याचे सांगत आरोपांचे खंडन केले. नायडूंनीही खडसे यांनी स्वत:हून दिलेल्या राजीनाम्याचे कौतुक केले.

खडसेंचा प्रतिसाद
भाजपची विधानसभेतील तोफ असलेल्या खडसे यांनी व्यासपीठावरच्या पहिल्या रांगेत बसून इतरांची भाषणे ऐकली. मुख्यमंत्री ‘नाथाभाऊं’वरील आरोपांच्या चिंधड्या उडवत असताना खडसे हाताची घडी घालून शांत बसले होते. फडणवीस नायडूंनी ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’वर केलेल्या टीकेला खडसेंनी टाळ्यांचा प्रतिसाद दिला, तर कधी विरोधकांना काढलेल्या चिमट्यांना दिलखुलास हसून दादही दिली. दुपारच्या सत्रात खासदार नाना पटोले यांनी कृषी संदर्भातील प्रस्ताव मांडला. त्यानंतर विनय सहस्रबुद्धे यांचे मार्गदर्शन झाले. या संपूर्ण कार्यक्रमात खडसे व्यासपीठावर होते. सायंकाळी प्रकाश जावडेकरांनी दिलेल्या मेजवानीला मात्र त्यांची उणीव भासत होती.
दरम्यान, आपच्या प्रिती मेनन अंजली दामानिया यांच्याविरुद्ध शंभर कोटींचा दावा दाखल करण्याची घोषणा खडसेंनी फेसबुक पोस्टमध्ये केली आहे.

...तेवढे कष्ट घ्यावेत
बालगंधर्व रंगमंदिरात आल्यापासून शेकडो जणांशी खडसे यांनी हस्तांदोलन केले. प्रकाश जावडेकर, विनय सहस्रबुद्धे यांच्यासह काही वरिष्ठांशी ते गप्पा मारत बसले. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशीही त्यांनी नेहमीच्या सहजतेने संवाद साधला; परंतु जोपर्यंत माझ्यावरचे सर्व आरोप निराधार असल्याचे सत्य जनतेसमोर येत नाही तोवर आता फार बोलणार नाही, असे ते म्हणाले. ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांच्यावर आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी आहे. तेवढे कष्ट त्यांनी आता घ्यावेत, असाही चिमटा त्यांनी काढला.

टाळ्यांचा कडकडाट
फडणवीसांनी खडसे यांच्यावरील प्रत्येक आरोप साधार खोडून काढला, तेव्हा प्रत्येक वेळी उपस्थितांनी टाळ्यांचा गजर करून ‘नाथाभाऊं’वरील प्रेम व्यक्त केले. मात्र, संपूर्ण कार्यक्रमात खडसेच काय पण कोणत्याच नेत्याच्या नावे एकही घोषणा देता भाजप कार्यकर्त्यांनी शिस्तीचे दर्शन घडवले. खडसंेनीही शक्तिप्रदर्शनाचा प्रयत्न केल्याचे दिसले नाही.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)