आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुजन, वडिलांचे प्रोत्साहन, रसिकांचे प्रेम हीच प्रेरणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे : मुली आहात म्हणून कुठलीही वेगळी वागणूक न देणारे गुरुजन, सतत प्रोत्साहन देणारे वडील आणि रसिकांचे प्रेम, यामुळेच बासरीवादनाच्या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाली, असे मनोगत युवा पिढीतील प्रसिद्ध बासरीवादक भगिनी देवप्रिया आणि सुचिस्मिता यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
‘सवाई गंधर्व संगीत महोत्सवा’च्या ‘अंतरंग’ उपक्रमात निवेदक मंगेश वाघमारे यांनी या भगिनींशी संवाद साधला. आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी या वेळी उपस्थित होते.

या दोघी भगिनींचे बासरीवादन गुरुवारी ‘सवाई’च्या रंगमंचावर सादर झाले. त्यांनी सादर केलेला राग मारवा प्रशंसनीय ठरला. या कौतुकाने दोघी भारावून गेल्या होत्या. ‘आम्ही वयाच्या चौथ्या वर्षापासून शिकत आहोत. पण मुली आहोत, तर नृत्य शिका, असे कोणी लादले नाही. उलट कुटुंबीयांनी बासरीवादनासाठी प्रोत्साहनच दिले.
गुरू पं. हरिप्रसादजी यांनीही त्यांच्या अन्य सर्व शिष्यांप्रमाणेच आम्हाला मानून शिकवले. मात्र, बासरीवादन क्षेत्रात स्त्रियांची संख्या नसल्याने रसिकांना आमचे कौतुक अधिक वाटते, याची आम्हाला जाणीव आहे. ‘सवाई’चा स्वरमंच ही कुठल्याही कलाकारासाठी भाग्याची संधी असते. या स्वरमंचाची प्रतिष्ठा, इथल्या चोखंदळ रसिकांची दाद, या गोष्टी कायम आठवणीत राहतील’, अशी भावनाही या दोघींनी व्यक्त केली.

समन्वय उपजतच बासरीवादन करताना एकलवादनाचा विचार कधी मनात आला नाही. अगदी बालवयापासून आम्ही एकत्र शिकत आलो आहोत. आमच्या वयात जेमतेम एक वर्षाचे अंतर आहे. त्यामुळे शिष्या म्हणून आम्ही सोबतीनेच शिकलो.
आमचा कलाविचारही समान असल्याने वादन करताना आमच्यात समन्वयाचा प्रश्न निर्माणच झाला नाही. ते उपजत असावे, इतके सहज आहे, असे सुचिस्मिता आणि देवप्रिया यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...