आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र प्रदेश युवक कॉँग्रेसला निवडणुकीचे वेध, कदम यांची दुस-या टर्मसाठी मोर्चेबांधणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - कॉँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौ-यानंतर प्रदेश युवक कॉँग्रेसला निवडणुकीचे वेध लागले आहेत. राहुलबाबांच्या आग्रहाखातर 2011 मध्ये प्रथमच पक्षांतर्गत पदांच्या नेमणुका निवडणुकीद्वारे घेण्यास सुरुवात झाली होती. प्रदेशाध्यक्षांचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष डॉ. विश्वजित कदम हे दुस-या टर्मसाठी इच्छुक आहेत.


‘आपण अध्यक्षपदासाठी दुस-यांदा इच्छुक आहोत. मागील दोन वर्षांतील कामाचा अहवाल दरमहा पक्षश्रेष्ठींकडे पाठवत होतो. पक्षश्रेष्ठींनी देशात अव्वल ठरविलेल्या मोजक्या युवक अध्यक्षांमध्ये माझाही समावेश आहे. त्यामुळेच पुन्हा या पदावर काम करण्याची संधी मिळावी, असा प्रयत्न असेल,’ असे कदम यांनी स्पष्ट केले.


युवकांना संधी द्या
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत युवक काँग्रेसच्या जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी, असा आग्रह राहुल गांधी यांच्याकडे केल्याचे कदम म्हणाले. पुण्यात सुरेश कलमाडी यांच्याऐवजी डॉ. कदम यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. या संदर्भात ते म्हणाले, की लोकसभा की विधानसभा लढवायची आणि तीही कुठून याचा निर्णय मात्र पक्षश्रेष्ठीच घेतील.


गतवेळी तांबेवर विजय
यापूर्वी अध्यक्षपदाची निवड थेट ‘हायकमांड’तर्फे केली जात असे. मात्र, राहुल गांधी यांनी त्यात बदल केला. पक्षसंघटनेतील पदेही निवडणुकीच्या माध्यमातून निवडली जाऊ लागली. 2011 मध्ये युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी प्रथमच निवडणूक झाली. वनमंत्री पतंगराव कदम यांचे पुत्र डॉ. विश्वजित आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांच्यात लढत झाली. त्यात डॉ. कदम यांनी 25 हजारांहून अधिक मते घेत तांबे यांच्यावर दहा हजारांहून अधिक मतांनी मात केली होती.


घराणेशाही कायमच
युवक काँग्रेसच्या पहिल्याच निवडणुकीत पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, नरेश पुगलिया यांची पुढची पिढी निवडून आली. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि विलासराव देशमुख यांची मुलेही तेव्हा निवडणुकीसाठी इच्छुक होती; परंतु ‘युवक काँग्रेस’साठी राहुल यांनी 35 वर्षे वयाची अट घातल्याने त्यांना शांत राहावे लागले. सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती यांचेही नाव चर्चेत होते; परंतु त्यांनी स्वत:हून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. या वेळी त्यांचा पवित्रा काय असेल, हे स्पष्ट झालेले नाही.