आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eminent Scientist And The Father Of The Indian Monsoon Model, Dr Vasant Gowarikar No More

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांचे पुण्यात निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांचे आज दुपारी साडेतीनच्या सुमारास पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. ते 81 वर्षाचे होते. अवकाश संशोधन, हवामान, लोकसंख्या क्षेत्रात डॉ. गोवारीकर यांनी अमूल्य योगदान दिले आहे.
गोवारीकर यांचे हवामान संशोधनात मोठे योगदान होते. अवकाश व लोकसंख्या क्षेत्रात संशोधनात्मक अभ्यास होता. 'आय प्रेडिक्ट' नावाचे लोकसंख्यावर आधारित त्यांनी पुस्तक लिहले होते. गोवारीकर यांनी दिलेल्या योगादानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ते कुलगुरू राहिले होते. विविध पुस्तके व निबंध त्यांच्या नावावर आहेत. सन 1991 ते 93 मध्ये ते पंतप्रधानांचे सल्लागार होते.
डॉ. गोवारीकर हे जन्माने पुणेकर; मात्र त्यांचे उच्च महाविद्यालयीनपर्यंतचे सर्व शिक्षण कोल्हापूर येथे झाले. इंग्लंडमधील बर्मिंगहॅम विद्यापीठातून त्यांनी पीएचडी प्राप्त केली. रसायन अभियांत्रिकी हा त्यांचा मुख्य विषय होता. देशप्रेमामुळे त्यांना भारतात येऊन रचनात्मक कार्याची इच्छा होती. त्यानुसार तत्कालीन अणुशक्ती आयोगाचे अध्यक्ष डॉ. विक्रम साराभाईंच्या प्रोत्साहनामुळे तुंबा येथील इस्रोच्या प्रयोगशाळेत डॉ. गोवारीकर प्रॉपलंट इंजिनीअर या पदावर रुजू झाले. अनेक प्रतिकूल बाबींवर विजय मिळवत 21 फेब्रुवारी 1969 रोजी एका अग्निबाणाने यशस्वीरित्या अवकाशात झेप घेतली. या अग्निबाणात असलेले घनइंधन गोवारीकर यांनी तयार केले होते. या आणि अशा अनेक यशांचे टप्पे गाठता गाठता डॉ. गोवारीकर 1979 साली विक्रम साराभाई अंतरीक्ष केंद्रातील पाच हजार सहकाऱ्यांचे मुख्य झाले.

डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्यासारख्या सहकाऱ्यांबरोबर संशोधन करायची संधी त्यांना मिळाली. 1986 मध्ये ते विज्ञान तंत्रज्ञान खात्याचे सचिव झाले. पंतप्रधानांनी त्यांच्यावर 27 हजार कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी टाकली. येथे त्यांनी विज्ञानातील विविध विषयातील प्रकल्प यशस्वी करून दाखविले. विज्ञान प्रसाराकरीता विशेष योजना आखल्या. शेतकऱ्यांसाठी खतांचा ज्ञानकोष तयार केला. मान्सूनचा अंदाज व्यक्त करण्यासाठीचे सुधारित मॉडेलही त्यांनी तयार केले. लोकसंख्यावाढीसंबंधी त्यांनी जी पूर्वी मांडणी केली होती. ती आता बरोबर असल्याचे आढळून आले आहे.

पुढे आणखी वाचा, डॉ. गोवारीकर यांच्याविषयी...