आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Environment Day Special: No Event In Tree Plantation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पर्यावरणदिन विशेष : वृक्षारोपणाचे इव्हेंट नकाेत, सल्ला घेऊन झाडे लावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पर्यावरणदिनी ऊठसूट दिसतील, उपलब्ध होतील ती रोपे वाटणे किंवा लावणे चुकीचे आहे. प्रत्येक वृक्ष, झुडूप, वेली, फळझाडे वा फुलझाडे यांचा स्वत:चा अधिवास आणि परिसंस्था असते. ती दुर्लक्षित करून नुसते धूमधडाक्यात रोपवाटप, वृक्षारोपणाचे ‘इव्हेंट’ करणे बंद केले पाहिजे आणि पर्यावरणप्रेमींनी आधी ‘पर्यावरण साक्षरता’ अंगी बाणवली पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन पर्यावरणतज्ज्ञ व "बायोस्पिअर्स' संस्थेचे संचालक डॉ. सचिन पुणेकर यांनी केले आहे. तसेच कोणत्या ठिकाणी कोणती रोपे, झाडे लावावीत, याचा सल्ला देणारे ‘वृक्षारोपण सल्लागार मंडळ’ (ट्री प्लांटेशन अडव्हायजरी बोर्ड) स्थापन करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
सध्या विविध दिनांचे औचित्य साधून वृक्षारोपण, रोपवाटप वा बिया वाटपाचे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. पण कुठल्या अधिवासात कुठली रोपे वाढतात, टिकतात आणि वाढतात, याविषयी शास्त्रीय माहिती कुणाकडेच नसते. फक्त कार्यक्रम आयोजित करण्याचा उत्साह तेवढा असतो. प्रत्यक्षात अशा उत्साही वृक्षारोपणातून, रोपवाटपातून काहीही साध्य होत नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे जनसामान्यांमध्ये पर्यावरणीय साक्षरता निर्माण करण्याची नितांत गरज असल्याचे ते म्हणाले.
‘कुठल्या प्रकारची झाडे, रोपे कुठे लावली पाहिजेत, याचा शास्त्रीय दृष्टिकोन आपल्याकडे हाेताना दिसत नाही. कोणते झाड टेकडीवर, बागेत, रस्त्याच्या कडेला, पाणवठ्यावर, नदीपात्राजवळ वाढते, हे माहिती नसल्याने चुकीची झाडे चुकीच्या ठिकाणी ‘समारंभपूर्वक’ लावली जातात
आणि आठवडाभरात ती नष्ट होतात, ही वस्तुस्थिती आहे. यातून आपण पर्यावरणाचे रक्षण करत नसून नुकसानच करतो, याची जाणीवही नसते. त्यामुळे पर्यावरण टिकवण्याऐवजी आपण चुकीचा हस्तक्षेप तेवढा करतो. हे टाळले पाहिजे,’ असेही डॉ. पुणेकर म्हणाले.
परवानगी घेऊनच झाडे लावावीत
कुठल्याही व्यक्ती वा संस्थेला वृक्षारोपण करायचे असेल तर त्यांनी आधी या मंडळाकडे अर्ज करून रीतसर परवानगी घेतली पाहिजे. हे मंडळ त्यांना कुठली झाडे वा रोपे, बिया कुठे, कशा पद्धतीने लावल्या पाहिजेत, याचा सल्ला देईल. परवानगीचे पत्र देईल आणि त्यानंतरच वृक्षारोपण केले जावे. ही योजना राबवण्यासाठी ‘वृक्षारोपण सल्लागार मंडळा’ची स्थापना केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पर्यावरणीय साक्षरता कार्यशाळा
जनसामान्यांमध्ये पर्यावरणीय साक्षरता रुजावी यासाठी ‘बायोस्पिअर्स’चे डॉ. सचिन पुणेकर यांनी ‘पर्यावरणीय साक्षरता कार्यशाळे’चे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत सर्व पर्यावरणप्रेमींना मुक्त प्रवेश असेल. तज्ज्ञांकडून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जाईल आणि केवळ ‘उत्साही’ वृक्षारोपणापलीकडे जाऊन पर्यावरणविषयक डोळस दृष्टिकोन तयार होईल, हा उद्देश कार्यशाळेच्या आयोजनामागे आहे.
जैविक वारसा दिनदर्शिका
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वन विभागाच्या वतीने ‘जैविक वारसा दिनदर्शिका’ प्रकाशित होणार आहे. यामध्ये जिल्हावार जैविक वारसा मानचिन्हे, प्रत्यक्ष दिनदर्शिका (यामध्ये पर्यावरणाशी संबंधित सर्व दिवस हिरव्या रंगात दर्शवलेले असतील) आणि जागतिक पातळीवर मान्यता पावलेल्या पर्यावरणविषयक दिवसांची यादी प्रकाशित केली जाईल.