आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण विषयाला बाहेरचे तज्ज्ञ येणार, अकरावी-बारावीसाठी बोर्डाचा निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- इयत्ता अकरावी आणि बारावीसाठी पर्यावरण हा विषय अनिवार्य करण्यात आला आहे; पण तो अंतर्गत मूल्यमापनात मोडतो. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापन न करता गुणांची ‘खिरापत’ वाटतात, हे निदर्शनास आले आहे. हा प्रकार टळावा आणि योग्य मूल्यमापन व्हावे, यासाठी राज्य शिक्षण मंडळ बाहेरचे तज्ज्ञ बोलावणार आहे. ही नियुक्ती बोर्डाच्या वतीने केली जाणार आहे.

शिक्षण विभागाने पर्यावरण विषय इयत्ता अकरावी व बारावीसाठी अनिवार्य केला. त्यानुसार या विषयाची गुणविभागणी प्रत्येक सत्रात ३० गुण प्रकल्प आणि २० गुण अंतर्गत मूल्यमापन, अशी करण्यात आली. दोन्ही सत्रांतील प्रत्येकी ५० गुणांची बेरीज करून १०० पैकी मिळालेल्या गुणांचे ५० गुणांमध्ये रूपांतर करून ते गुण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत दर्शवले जात होते.

यंदापासून मात्र ही गुणपद्धती बदलण्यात येणार आहे. पर्यावरण विषय कनिष्ठ महाविद्यालयांत कला, वाणिज्य, विज्ञान, व्यावसायिक अभ्यासक्रम, द्विलक्ष्यी अभ्यासक्रम साऱ्या विद्यार्थ्यांना अनिवार्य आहे. यंदापासून ही गुणविभागणी दोन सत्रांत न करता वार्षिक पद्धतीने करण्यात येणार असल्याचे परिपत्रक राज्य शिक्षण मंडळाने प्रसिद्ध केले आहे.

पर्यावरण विषयाला गुण देताना कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक आपल्याच विद्यार्थ्यांना जास्त गुण देतात. त्यामुळे विषयाचे गांभीर्य व महत्त्व कमी होत होते. केवळ निकालाची टक्केवारी वाढवण्यासाठी या खिरापतीचा उपयोग होत होता. त्याबाबत अनेक तक्रारीही मंडळाकडे आल्या होत्या. त्याची दखल घेत मंडळाने यंदापासून पर्यावरण विषयाचे मूल्यमापन अंतर्गत व बहिर्गत पद्धतीने होणार आहे. यासाठी बाह्य परीक्षकांची नियुक्ती मंडळच करणार आहे. अंतर्गत व बहिर्गत परीक्षक यांच्या एकत्रित परीक्षणातून यापुढे विद्यार्थ्यांना ५० पैकी गुण दिले जाणार आहेत. त्यामुळे मूल्यमापन योग्य पद्धतीने होऊन, गैरप्रकार रोखले जातील.