आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे आजपासून राज्यभर ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ अभियान, बुलडाण्यातून सुरुवात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्य सरकारने कर्जमाफीसंदर्भात फसवे आणि खोटे आकडे देऊन राज्यातील शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. सरकारचा खोटेपणा उघड करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी काँग्रेस पक्ष बुधवारपासून (ता. १२) ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ हे राज्यस्तरीय अभियान राबवणार आहे, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मंगळवारी मुंबईत केली.  या अभियानाची सुरुवात बुलडाण्यातून हाेणार अाहे.   
 
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या नेत्यांची मंगळवारी सायंकाळी बैठक झाली. त्यानंतर चव्हाण पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नसीम खान, बसवराज पाटील, खासदार  हुसेन दलवाई,  विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस आदी नेते उपस्थित होते.   
 
चव्हाण म्हणाले, ‘फडणवीस सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यासाठीच्या जाचक अटींमुळे बहुतांशी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, ज्यांचा सातबारा कोरा होणार नाही, अशा सर्व शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन प्रदेश काँग्रेस फडणवीस सरकारला निवेदन देणार आहे.  राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, ही काँग्रेस पक्षाची मागणी आजही कायम आहे. ३० जून २०१७ पर्यंत थकीत असलेल्या अाणि कर्ज पुनर्गठीत केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईपर्यंत काँग्रेस पक्षाचा लढा सुरूच राहील’, असे चव्हाण म्हणाले.   
 
या बैठकीत जीएसटी कायद्यासंदर्भातही चर्चा झाली. जीएसटीबाबत जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. 

सध्या लागू केलेला जीएसटी कायदा काँग्रेसला अपेक्षित असा नाही. जीएसटी विधेयकातील अटींमुळे व्यापारी- व्यावसायिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागणार आहे. जीएसटीमुळे भिवंडी, इचलकरंजी येथील कपडा उद्योग ठप्प झाला आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला. तसेच माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम हे राज्यभरात विविध ठिकाणी सभा घेऊन जीएसटीसंदर्भात सरकारला उघडे पाडणार आहेत. या अभियानाची सुरुवात पुण्यातून होणार असल्याचे खासदार अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.  
 
राधाकृष्ण विखेंच्या बातम्यांचा विपर्यास  
विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपत जाणार, या बातम्या विपर्यास केलेल्या आहेत, असे अशोक चव्हाण यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले. ‘विखे पाटील यांच्या शिर्डीतील ‘त्या’ विधानासंदर्भात आजच्या बैठकीत काही एक चर्चा झाली नाही’, असे बैठकीला हजर असलेल्या नेत्यांनी सांगितले.   
बातम्या आणखी आहेत...