आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसैनिकांसारखी रग मनसे कार्यकर्त्यांत हवी, मनसे प्रमुख राज ठाकरे यांची अपेक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई-‘प्रत्येक निवडणूक काही तरी शिकवत असते. पराभवापासून धडा घ्यायचा असतो, त्यामुळे खचून जाऊ नका, कामाला लागा.. आपल्यासाठी ही शेवटची संधी आहे’, अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी शुक्रवारी गाेपनीय बैठकीत मनसैनिकांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला. पक्ष कार्यकर्त्यांसाठी आचारसंहितेची घाेषणा करतानाच ‘शिवसैनिकांची रग तुमच्या अंगात हवी’ अशी अपेक्षाही राज यांनी बाेलून दाखवली.
विधानसभेतील पराभवानंतर धारण केलेले मौन अखेर राज ठाकरेंनी शुक्रवारी साेडले. रवींद्र नाट्यमंदिरात झालेल्या चिंतन बैठकीत बोलताना त्यांनी पक्षाची दिशा स्पष्ट केली. पक्षातील बेशिस्त संपवण्यासाठी आणि अंतर्गत कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी कार्यकर्त्यांसाठी एक आचारसंहिता लागू करणार अाहाेत. ९ मार्च रोजी होणाऱ्या नवव्या वर्धापन दिनी पक्षाची पुढची दिशा स्पष्ट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पक्षाच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी काही उपाययोजना केल्या जाणार अाहेत. या अंतर्गत प्रत्येक शाखेचे एक स्वतंत्र बँक खाते उघडले जाणार आहे. निधी गोळा करणे, दैनंदिन खर्च यासाठी त्याचा वापर केला जाणार आहे. याशिवाय स्काइपच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी नेहमी संवाद साधणार असल्याचेही ते म्हणाले. पक्ष सोडणाऱ्यांविषयी मात्र ते काहीच बाेलले नाहीत. ‘आपल्या पक्षाची काळजी करण्याची कुणालाही गरज नाही. मी आणि कार्यकर्ते काय ते पाहून घेऊ. वादळ काय असते ते मला सांगण्याची गरज नाही, ते कसे आणि केव्हा निर्माण करायचे ते मला समजते.. योग्य वेळी ते मी निर्माण करीन,’ असा विश्वासही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

शिवसैनिकांचे कौतुक
राज यांनी शिवसैनिकांचेही कौतुक केले. ‘बाळासाहेबांच्या काळातल्या शिवसैनिकांसारखी रग आपल्यात असू द्या’ असे सांगत त्यांनी एक उदाहरण दिले. ‘पूर्वी शिवसेना भवनावर कम्युनिस्टांनी हल्ला केला. त्या वेळी काही मूठभर शिवसैनिकांनी तो हल्ला परतवून लावल्याचे सांगताना राज म्हणाले की, या शिवसैनिकांकडे साधी काठीपण नव्हती, पण कम्युनिस्टांना पळवून लावण्यासाठी त्यांनी शिवसेना भवनातल्या बल्बचा वापर केला. तशीच रग तुमच्यात ठेवा. कठीण परिस्थितीत खचून न जाता त्याला सामोरे जा, असा सल्ला त्यांनी दिला.

अजूनही ‘वन मॅन शो'
पक्षाच्या कार्यपद्धतीत बदल होणार याचे काही संकेतही बैठकीत मिळाले. संपूर्ण बैठकीत राज ठाकरे हे एकटेच व्यासपीठावर होते. इतर प्रमुख नेते मात्र व्यासपीठाच्या खाली पहिल्या रांगेत बसले होते, अशी माहिती एका पदाधिकाऱ्याने दिली. याशिवाय राज यांनी आपल्या भाषणात काही युवा नेत्यांच्या कामाचे कौतुक केले. मात्र, बड्या नेत्यांच्या नावाचा साधा उल्लेखही केला नाही.