आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fadnavis Government Not Make Mimicry, Prithviraj Chavan Expectation

फडणवीस सरकारने सोंग आणू नये, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची अपेक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारात टोल, एलबीटी, धनगर आरक्षण यासारख्या अनेक मुद्द्यांवर जनतेला टाइमबाउंड' आश्वासने दिली होती. मात्र, यातले एकही आश्वासन फडणवीस सरकार पूर्ण करू शकलेले नाही. याबद्दल त्यांनी किमान आता जनतेची क्षमा मागावी. पैसे नसतील तर सोंग आणू नये,' अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी व्यक्त केली.

‘काही प्रश्न सोडवायला वेळ लागतो हे मला मान्य आहे. त्यात सरकार नवीन आहे. त्यांना थोडा वेळही द्यायला पाहिजे, परंतु यांनीच उत्साहाच्या भरात अनेक घोषणा जोरजोरात केल्या. या घोषणा पूर्ण करता येत नसल्याची वस्तुस्थिती फडणवीस सरकारने जनतेला समजावून सांगावी. रेटून बोलू नये,’ अशी सूचनाही चव्हाण यांनी पुण्यातील पत्रकारांशी बोलताना केली. दुष्काळ निवारणासाठी आणि शेतक-यांच्या हितासाठी चौदा हजार कोटी खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. अर्थसंकल्पात ही तरतूद आम्हाला दिसली पाहिजे, असेही चव्हाण यांनी बजावले. चव्हाण म्हणाले की, आमच्या सरकारने राज्याच्या डोक्यावर मोठे कर्ज करून ठेवल्याने तिजोरी रिकामी असल्याचे सध्याचे सरकार जनतेला सांगते.

वास्तविक राज्य कोणाचेही असले तरी कर्ज घ्यावेच लागते. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार राज्याच्या एकूण उत्पन्नाच्या २३ टक्क्यांपर्यंत कर्ज घेता येते. आमच्या काळात कर्जाचे प्रमाण साडेअठरा टक्क्यांपर्यंत गेले. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत हे कर्ज खूप कमी आहे. त्यामुळे राज्य सरकारला आणखी कर्ज घेऊन जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी निधी मिळवता येईल. तिजोरी रिकामी असल्याचे कारण त्यांना देता येणार नाही. एलबीटी रद्द करण्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीस, अर्थमंत्री मुनगंटीवार, केंद्रीय मंत्री गडकरी यांनी वेगवेगळी विधाने केली आहेत. यांच्यात नेमके खरे कोण बोलते, हा प्रश्न असल्याचा टोला चव्हाण यांनी लगावला.

भाजपकडे "लीडरशिप क्रायसिस'
दिल्लीमध्ये किरण बेदी यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर करण्याच्या भाजपच्या निर्णयावर पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली. ते म्हणाले, ‘काही अपवाद वगळता भाजपकडे कुठेच नेते नाहीत. "लीडरशिप क्रायसिस'मुळे त्यांना आयात नेत्यांवर अवलंबून राहावे लागते.’ काँग्रेस नेतृत्वहीन नाही का, या प्रश्नावर ते म्हणाले की ‘आमच्याकडे नेतृत्व आहे; परंतु जनतेने विरोधात बसण्याचा कौल दिला आहे.’