आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fake Facebook Account, Youth Suicide In Police Commissioner Building

बनावट फेसबुक अकाऊंटच्या चौकशीला कंटाळून पुण्यातील तरुणाची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- बनावट फेसबुक खाते काढून ओळखीच्या तरूणीशी चॅटिंग केल्याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावलेल्या एका तरुणाने पुणे पोलिस आयुक्तालयाच्या चौथ्या मजल्यावरून 12 जानेवारी रोजी उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. रुबी रुग्णालयात उपचार घेत असताना या तरुणाचा मंगळवारी मृत्यू झाला. सुजित अजित प्रधान (वय 19, रा. मोरवाडी, पिंपरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
सुजित हा पिंपरीतील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. फेसबुकवर मुलीच्या नावाने एक बनावट खाते तयार करून त्याच्याच महाविद्यालयातील तरुणीस त्रास देत असल्याची त्याच्याविरोधात तक्रार दाखल झाली होती. याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने सुजितला चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार 12 जानेवारी रोजी सुजित आपल्या मोठ्या भावासह पुणे पोलीस आयुक्तालयातील सायबर गुन्हे शाखेच्या चौथ्या मजल्यावरील कार्यालयात आला होता. त्याच्या भावाला तिथे गेल्यावर सुजितविरोधातील तक्रारीची माहिती कळली. त्यामुळे भावाने सुजितची चांगलीच कानउघडणी केली होती. या तक्रारीच्या पोलिसांच्या चौकशीच्या तणावातून सुजितने थेट चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला.
या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सुजितला ससुन रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास रुबी रुग्णालयात हलविण्यात आले. तिथेच उपचार सुरू असताना मंगळवारी सुजितचा मृत्यू झाला.