आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीआरडीओमध्‍ये नोकरीचे आमिष, पितापुत्रीची आत्‍महत्‍या; आई-मुलगा गंभीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती- डीआरडीओमध्‍ये नोकरी लावून देण्‍याच्‍या आमिषाला बळी पडलेल्‍या एका कुटुंबाने सामुहिक आत्‍महत्‍या केल्‍याचा प्रकार बारामतीत घडला आहे. या घटनेत वडील आणि मुलीचा मृत्‍यू झाला आहे. तर आई आणि मुलाची प्रकृती अतिशय गंभीर आहे.

सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, हणमंत काशीनाथ म्‍हसवळकर (52) यांनी मुलगा राहूल (23) याच्‍या नोकरीसाठी डीआरडीओमध्‍ये प्रयत्‍न केले होते. नोकरी लावून देतो, असे सांगू काही जणांनी त्‍यांना संपर्क केला. मुलाच्‍या नोकरीसाठी त्‍यांनी गेल्‍या काही महिन्‍यांमध्‍ये जवळपास 65 लाख रुपये काही जणांना दिले होते. म्‍हसवळकर यांनी एवढा पैसा खर्च करुनही मुलाला नोकरी मिळाली नव्‍हती. त्‍यामुळे संपूर्ण कुटुंब प्रचंड तणावात होते. अखेर सर्वांनी आत्‍महत्‍येचा निर्णय घेतला.

सर्वांनी विष प्राशन करुन आत्‍महत्येचा प्रयत्‍न केला. त्‍यात आई आणि मुलगा बचावले. मात्र, म्‍हसवळकर आणि त्‍यांची 17 वर्षांची मुलगी संध्‍याराणी यांचा मृत्‍यू झाला. सर्वांनी विष घेतले होते. परंतु, संध्‍याराणीच्‍या गळ्यावर काही व्रण आढळले आहेत. त्‍यामुळे तिचा गळा दाबण्‍यात आला होता, हे स्‍पष्‍ट झाले. मात्र, तिची गळा दाबून हत्‍या केली की घरात भांडण झाल्‍याने वादावादीत तिचा गळा दाबला आणि नंतर विष प्राशन केले, याबाबत शवविच्‍छेदन अहवाल आल्‍यानंतरच कळेल.

हणमंत म्‍हसवळकर हे दौंड तालुक्‍यात माध्‍यममिक शिक्षक म्‍हणून काम करतात. त्‍यांनी सुसाईड नो लिहून ठेवली होती. त्‍यात त्‍यांनी ज्‍यांना पैसे दिले, त्‍यांची नावे लिहीली आहेत. त्‍या लोकांनी फसवणूक केल्‍यामुळेच आत्‍महत्‍या करीत आहे, असे या नोटमध्‍ये त्‍यांनी लिहीले आहे. म्‍हसवळकरांनी त्‍यांच्‍या भाच्‍याला घरी महत्त्वाचे काम असल्‍याचे सांगू बोलाविले होते. तो घरी येताच आतमध्‍ये त्‍याला भीषण चित्र दिसले. त्‍यानेच पोलिसांना सूचना दिली.

म्‍हसवळकर यांची पत्‍नी तसेच मुलाला बारामतीतील एका रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे. यासंदर्भात पोलिसांनी तपास सुरु केल आहे. लवकरच प्रकरणाचा उलगडा होईल.