आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई-वडील, पत्नी माझ्याकडे येणार होते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माळीण (जि. पुणे) - दिवाळीनंतर आई-वडील, पत्नी व मुलगी पुण्यात माझ्याकडे राहायला येणार होते. मात्र, नियतीने खेळ केला व या दुर्दैवी घटनेत कुटुंबातील 20 लोक गाडले गेले. सहा वर्षांचा मुलगा माझ्यासोबत पुण्यात होता. त्यामुळे तो बचावला, असे सांगताना सखाराम झांजरे यांचे डोळे पाणावले.

झांजरे म्हणाले, पुण्यात पीएमपीएमएलमध्ये चालक आहे. या घटनेची माहिती मला शिवाजीनगर येथून कोंढव्याची बस घेऊन जाताना बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता समजली. मी तातडीने शिवाजीनगरला येऊन आगारप्रमुखांना माहिती देऊन माळीणचा रस्ता धरला. गावात पोहोचल्यावर घराकडे पाहतो, तर घराच्या ठिकाणी केवळ मला मातीचा मोठा ढिगारा दिसला. गावात नऊ एकर शेती असल्याने आई-वडील चुलत्यांसोबत गावात राहत होते. भात लागवडीची कामे सुरू असल्याने मी पत्नीला चिमुकल्या मुलीसह त्यांच्याजवळ ठेवले होते. गेल्या महिन्यात आई-वडिलांना पुण्यात येण्याचा आग्रह केला होता. सहा वर्षांचा मुलगा व दोन भाऊ पुण्यात असल्याने बचावले. मात्र, आई-वडील, पत्नी, मुलगी, दोन चुलते, चुलत्या, त्यांच्या सुना व मुले या ढिगार्‍याखाली गाडली गेली.

मुलास काय सांगू? सखाराम झांजरे यांच्यासोबत राहणारा त्यांचा लहान मुलगा या घटनेत सुखरूप राहिला आहे. त्याची बहीण, आई, आजी, आजोबा, भावंडे अचानकपणे कुठे गायब झाली आहेत, याचे त्याला काय उत्तर द्यावे, असा प्रश्न मला सतावत असल्याचे झांजरे म्हणाले. घरातील सर्वच माणसे या घटनेत गाडली गेल्याने मातीच्या ढिगार्‍यासोबतच दु:खाचा डोंगर आमच्यावर कोसळल्याचे सांगतानाच त्यांच्या तोंडून शब्द फुटेनासे झाले.