आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाेरीस गेलेली अनमाेल ‘स्वरकुपी’ मिळाली परत, प्रसिद्ध शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या भावना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या पुण्यातील निवासस्थानी झालेल्या चोरीत त्यांचे मोबाइल संच आणि हार्डडिस्क चोरट्याने लांबवली होती. मात्र, मोबाइलपेक्षाही प्रभाताईंना रुखरुख लागली होती, ती हार्डडिस्कची.. कारण त्यावर त्यांच्या जुन्या बंदिशींचा ठेवा ध्वनिमुद्रित स्वरूपात संग्रहित केला होता. पोलिसांच्या तत्पर तपासामुळे मोबाइलसह ही हार्डडिस्कही सुव्यवस्थित स्वरूपात मिळाल्याने डॉ. अत्रे यांनी पुणे पोलिसांचे विशेष आभार मानले आहेत.  
 
डॉ. अत्रे यांच्या पुण्यातील जंगली महाराज रस्त्यालगतच्या गल्लीतील बंगल्यात शुक्रवारी (९ जून) रात्री चोरी झाली. चोरट्याने त्यांच्या घरातील मोबाइल संच आणि हार्डडिस्क पळवली. बंगल्यात कुणीच राहत नसल्याने दुसऱ्या दिवशी गायनाच्या क्लासच्या विद्यार्थिनी आल्यावर चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर डॉ. अत्रे यांना त्वरित  पोलिसांकडे तक्रार दिली. प्रथितयश कलावंताच्या घरी चोरी झाल्याने पोलिस यंत्रणा झपाट्याने कामाला लागली आणि तीन दिवसांत पोलिसांनी चोराला पकडले. हा चोर अल्पवयीन (१६ वर्षे) असून, त्यानेच ही चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्येही आढळले होते. चोराने त्याची कबुलीही दिली.
 
मंगळवारी या मुलाकडून चोरलेले मोबाइल आणि हार्डडिस्क पोलिसांनी पुन्हा डॉ. प्रभा अत्रे यांच्या निवासस्थानी आणून त्यांच्याकडे सुपूर्द केली. हार्डडिस्क सुखरूप असल्याचे पाहिल्यानंतर प्रभाताईंनी त्या हार्डडिस्कचे खरे महत्त्व विशद केले.  बंदिशकार म्हणून विख्यात असणाऱ्या प्रभाताईंच्या जुन्या बंदिशींचा खजिना या हार्डडिस्कमध्ये होता. नेमकी तीच डिस्क चोरीला गेल्याचे समजल्यावर मी अतिशय अस्वस्थतेत हे चार दिवस काढले. मोबाइल मी पुन्हा घेऊ शकले असते; पण या हार्डडिस्कवरचे सूर मी पुन्हा कसे मिळवले असते, असा सवाल त्यांनी केला. पोलिसांनी त्वरित चोरी उघडकीस आणून माझ्यासाठी अनमोल असणाऱ्या वस्तू मला पुन्हा मिळवून दिल्या, याबद्दल मी शतश: आभारी आहे, असे त्या म्हणाल्या.  

जुन्या बंदिशींचा खजिना  
चोरीला गेलेल्या हार्डडिस्कमध्ये जुन्या बंदिशी तर होत्याच; पण नव्या पुस्तकाची संकल्पना, मजकूर, काही दुर्मिळ ध्वनिमुद्रणे, नवे प्रकल्प यांचीही माहिती संकलित स्वरूपात होती. पैशात त्याचे मोल करणे शक्य नव्हते. ते चोरल्याने मी फार अस्वस्थ झाले होते. पण पोलिसांच्या तत्पर शोधाने मला हे धन परत मिळाले.  
- डॉ. प्रभा अत्रे, प्रसिद्ध गायिका
बातम्या आणखी आहेत...