आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूक व्यथा-वेदनांचा दिल्लीत एल्गार; आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे नातेवाईक मोर्चासाठी रवाना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सलग दोन वर्षे पावसानं हुलकावणी दिली..त्यापायी धन्यांनी कर्ज काढलं..ते फिटलं नाहीच, पण पाठोपाठ मुलीचं लगीन करायचं म्हणून पुन्हा कर्ज घेतलं..तो डोंगर सोसला नाही तसं जगणंच थांबवलं..परभणीच्या पद्मीन तुकाराम गव्हाणे आपली व्यथा मांडत होत्या..चंदा वाघमारे, शिवनंदा शिंदे, ज्योती कोरडे, विजया चव्हाण, सविता धाडे, शांताबाई  हारगुडे...थोड्याफार फरकाने साऱ्या जणींची व्यथा समानच होती..लागोपाठच्या  दुष्काळानं होरपळलेल्या शेतांमुळे कर्जबाजारी होऊन आत्महत्या  केलेल्या  शेतकऱ्यांच्या या माता-पत्नी-भगिनी..आपली वेदना आता राजधानी दिल्लीत मांडणार आहेत.  


 स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांच्या  नेतृत्वाखाली हिवाळी अधिवेशनाच्या  तोंडावर राजधानीत देशभरातील शेतकऱ्यांचा मोर्चा धडकणार आहे. या मोर्च्यासाठी  मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांतून शेतकरी मंडळी रवाना होत आहेत. परभणीतील आत्महत्याग्रस्त  कुटुंबांतील सुमारे २५ महिला व त्यांचे नातेवाईक, असा ५० जणांचा चमू शनिवारी सायंकाळी पुणे रेल्वे स्थानकावरून दिल्लीकडे मार्गस्थ झाला. रेल्वे प्रशासनाकडून संघटनेने स्वतंत्र रेल्वेची मागणी केली होती. या रेल्वेचे ‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’ असे नामकरण करत शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केले.   


 पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर दुपारपासून मराठवाड्यातील शेतकरी कुटुंबीय जमले होते. आळंदी येथे माऊलींच्या  समाधीचे दर्शन घेऊन ही मंडळी रेल्वे आली होती. यातील प्रत्येकांची व्यथा जवळपास सारखीच होती. ‘पावसानं ओढ दिल्यावर कर्ज काढून कसंतरी घर चालवलं. पण परतीच्या पावसानं फटका दिला आणि उभं पीक आडवं झाल्याचं दु:ख मालकांना सहन झालं नाही. शेतातल्या खोपटातच गळफास घेऊन त्यांनी जीव दिला,’ हे सांगताना या महिलांचे डोळे पाणावले होते. नियोजित वेळेपेक्षा विलंबाने रात्री आठच्या  सुमारास ही स्वाभिमानी एक्स्प्रेस पुण्याहून दिल्लीकडे रवाना झाली.

बातम्या आणखी आहेत...