आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरीदादा दमानं, धीरानं ! तज्ज्ञांचा शेतक-यांना सल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - यंदाचे वर्षही दुष्काळी जाण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवल्यानंतर राज्य सरकार आणि कृषी विभागाची वाटचाल आपत्कालीन नियोजनाकडे सुरू झाली आहे. स्वतःच्या शेतात पुरेशी ओल निर्माण झाल्याशिवाय शेतक-यांनी पेरणी करूच नये, याचा सर्वाधिक प्रसार कृषी विभाग करणार आहे.

अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज घेऊन धूळपेरणी करण्याची प्रथा आहे. जमिनीत बी पडल्यानंतर ठरावीक दिवसांत पाऊस न आल्यास हा बियाणे आणि पेरणीचा खर्च वाया जातो आणि शेतक-यावर दुबार पेरणीची पाळी येते. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी विस्तार संचालक के. व्ही. देशमुख यांनी "दिव्य मराठी'ला सांगितले, 'दुबार पेरणीमुळे शेतक-याचे आर्थिक नुकसान होते. यंदा पाऊस वेळेत येण्याची आणि पुरेसा पडण्याची शक्यता कमी दिसते आहे. हे लक्षात घेऊन शेतक-यांनी दमदार ओल होण्याची वाट पाहावी, असा आग्रह आम्ही धरणार आहोत.'

कमी पावसाची शक्यता गृहीत धरून आंतरपिकांवर भर देण्याचा प्रसार केला जाणार आहे. मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात कापूस व तूर यांचे एकत्रित पीक घेण्याचा प्रघात आहे. कापूस-तूर ही पीकपद्धत बदलण्याचे आवाहन आम्ही करणार आहोत. कारण ही दोन्ही पिके दीर्घ मुदतीची आहेत. शिवाय दोन्हीवरील कीडरोगांचा त्रास एकमेकांना होतो. त्यामुळे शेतक-याच्या खर्चात वाढ होते,' असे देशमुख यांनी सांगितले. त्याएेवजी कमी कालावधीत येणारी पिके शेतक-यांनी घ्यावीत. आंतरपिके घेतल्यास किमान एक पीक हाती लागण्याची शक्यता वाढेल आणि नुकसानीची तीव्रता कमी होईल, असे ते म्हणाले.

आंतरपिकांवर भर
पाऊस लांबण्याची आणि दोन पावसांमधले खंडित अंतर वाढण्याची शक्यता गृहीत धरून एक दीर्घावधीचे व एक कमी कालावधीचे पीक निवडावे. या दृष्टीने कापूस व उडीद किंवा मूग, सोयाबीन व तूर अशी आंतरपिके कृषी विभागाने सुचवली आहेत. एक हेक्टर भात लागवडीसाठी १० गुंठे रोपवाटिका तयार करावी, असे सांगण्यात आले आहे.

कृषी विभागाचे परिस्थितीवर लक्ष
कमी पावसाचे वर्ष ठरण्याची भीती हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या दृष्टीने कृषी विभाग कामाला लागला आहे. मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांनी नुकतीच सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची बैठक घेऊन आपत्कालीन व्यवस्थेला तोंड देण्याची तयारी करण्याच्या सूचना केल्या आहेत. पाऊस लांबल्यास कोणती पिके घ्यावीत, वाण कोणते निवडावे याबद्दल कृषी विद्यापीठांचा सल्ला शेतक-यांपर्यंत पोचवण्याचे काम तत्परतेने केले जाईल. पावसाच्या स्थितीवर कृषी विभाग लक्ष ठेवून आहे. अापत्कालीन कृषी नियाेजनाचा अाढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने बुधवारी दिल्लीत बैठक बाेलावली अाहे.
विकास देशमुख, कृषी आयुक्त

खते-बियाणे मुबलक
राज्याचे सरासरी खरीप क्षेत्र दीड कोटी हेक्टर आहे. राज्याची बियाण्याची गरज १६ लाख क्विंटल आहे. सध्या १७ लाख क्विंटल बियाण्याची उपलब्धता आहे. गरजेनुसार कापूस, सोयाबीनचे दोन लाख क्विंटल अतिरिक्त बियाणे उपलब्ध करून दिले जाऊ शकते. गेल्या वर्षी खरिपात सुमारे ३२ लाख टन रासायनिक खतांची विक्री झाली होती. यंदा राज्याला ४२ लाख टन रासायनिक खत मिळणार आहे. खते-बियाण्यांचा तुटवडा भासण्याची शक्यता अजिबात नसल्याने शेतक-यांनी पावसाचा अंदाज घेऊनच खरेदी करावी.'
जयंत देशमुख, कृषी निविष्ठा संचालक.