आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुणे - प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या परिसरात घातपात होण्याची माहिती मिळाल्यामुळे पोलिसांनी शनिवारी पहाटे तीन ते सकाळी अकरा वाजेपर्यंत या परिसराची नाकेबंदी केली होती. या काळात पोलिस, बॉम्बशोधक पथक, श्वानपथक आणि अन्य यंत्रणांनी मंदिराचा सर्व परिसर पिंजून काढला. मात्र धोकादायक वस्तू नसल्याचा निर्वाळा दिल्यावर या परिसरातील व्यवहार सुरळीत झाले.
दरम्यान, शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास दौंड - पुणे रेल्वेमार्गावर पोलिसांनी एक जखमी व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.‘मला एकाने बॅग देऊन ती दगडूशेठ मंदिर परिसरात ठेवण्यास सांगितले होते. मी नकार दिल्यावर मला मारहाण केली,’ असा जबाब या जखमी व्यक्तीने दिल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही. रविवारी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी शहरात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या घडामोडींना अधिक महत्त्व आले आहे. पोलिस उपायुक्त चंद्रशेखर दैठणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास मंदिर परिसरात दहशतवादी कारवाईची माहिती मिळाली आणि त्वरित या परिसरात नाकेबंदी करण्यात आली. मंदिराकडे येणारे सर्व रस्ते, चौक, गल्ल्या बंद करून तपासणीला सुरुवात झाली. आठ तास हा परिसर पिंजून काढण्यात आला.
जिजामाता चौक, शनिवारवाडा, आप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी, मजूर अड्डा, बेगबाग परिसर पोलिसांनी अन्य यंत्रणांच्या मदतीने पिंजून काढल्या. मात्र कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह वस्तू वा चिन्ह न आढळल्याने पोलिसांनी सकाळी बाराच्या सुमारास परिसर पुन्हा खुला केला. तोवर या परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली.
मात्र ही खबर मिळाली कुठून, याबाबत अधिक माहिती देण्यास दक्षिण विभागाचे पोलिस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर यांनी नकार दिला. माहितीची खातरजमा करण्यात येत आहे. त्यासाठी वेळ लागेल मात्र नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.