आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एफटीअायअाय संचालकांच्या कार्यालयात राडा; पाच विद्यार्थी अटकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट अाॅफ इंडिया (एफटीअायअाय) संस्थेत प्राेजेक्ट अॅसेसमेंट संदर्भातील शंका व संस्थेच्या भूमिकेसंदर्भात भेटण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांनी साेमवारी रात्री प्रभारी संचालक प्रशांत पाठराबे यांच्या कार्यालयात गाेंधळ घालून साहित्याची ताेडफाेड केली. याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री पाच विद्यार्थ्यांना अटक केली.
बुधवारी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन काेठडी ठाेठावली. तसेच प्रत्येकी तीन हजारांच्या जातमुचलक्यावर जामीनही मंजूर केला. विकास अर्स, राजू बिस्वास, अमेय गाेरे, हिमांशू प्रजापती, सचेत चाैधरी अशी या विद्यार्थ्यांची नावे अाहेत. तसेच इतर ११ विद्यार्थ्यांचा अटकपूर्व जामीनही मंजूर करण्यात अाला. ‘एफटीअायअाय’चे संचालक पाठराबे यांनी कार्यालयात गाेंधळ घालणाऱ्या ३० ते ३७ विद्यार्थ्यांविराेधात डेक्कन पाेलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली हाेती. त्यानुसार पाेलिसांनी या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले अाहेत. संस्थेच्या अध्यक्षपदी अभिनेते गजेंद्र चाैहान यांच्या नियुक्तीला विराेध करत मागील ७० दिवसांपासून विद्यार्थ्यांचे अांदाेलन सुरू अाहे. त्यातच संस्थेच्या मूल्यांकन पद्धतीवर विद्यार्थ्यांनी अाक्षेप घेतला असून त्याच्या विचारणेसाठी ४० ते ५० विद्यार्थ्यांनी १७ अाॅगस्ट राेजी संचालकांना घेराव घातला हाेता. प्राेजेक्ट अॅसेसमेंट रद्द करण्याची मागणी मंजूर हाेत नसल्याने विद्यार्थ्यांनी संचालकांना केबिनमध्ये काेंडून ठेवले. तसेच ताेडफाेडही केली हाेती. दरम्यान, एफटीआयआय मधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत आणि २००८ सालच्या बॅचच्या अपूर्ण प्रकल्पांच्या बाबत येत्या २२ ऑगस्ट रोजी एस. एम. खान, अंशू सिन्हा आणि एस. नागनाथन ही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची तीनसदस्यीय कमिटी एफटीआयआयमध्ये येऊन सगळ्या प्रकाराची पाहणी करणार अाहे.
विद्यार्थ्यांनी मला डांबून ठेवले
आंदोलक विद्यार्थ्यांनी कार्यालयात येऊन ठिय्या मांडला. सुमारे सहा ते सात तास ते एकच प्रश्न वारंवार विचारत होते, कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही मला जाऊ न देता घेराव घातला होता, यामुळे मी पोलिसांना पाचारण केले, असे एफटीआयआयचे प्रभारी संचालक प्रशांत पाठराबे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. विद्यार्थ्यांनी मात्र हे अाराेप फेटाळून लावले. प्रशांत पाठराबे, प्रभारी संचालक एफटीअायअाय
संचालक खोटे बोलत आहेत
प्रकल्पांच्या मूल्यांकनासंदर्भात नोटीस लावल्यानेे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी होती. त्यामुळे साेमवारी दुपारी विद्यार्थी, सर्व प्राध्यापक संचालकांच्या केबिनमध्ये गेलो. प्राध्यापकांचाही या अपूर्ण प्रकल्पांच्या मूल्यांकनाला विरोध आहे आणि याविषयीचे पत्र आम्ही दिले आहे. प्राध्यापक मूल्यांकनाच्या बाजूने आहेत हा पाठरावेंचा दावा खोटा आहे, तसेच विद्यार्थ्यांनी त्यांना धमकावले, डांबून ठेवले हा आरोपही खोटा आहे. संदीप चॅटर्जी, विभागप्रमुख, दिग्दर्शन